इंग्लंड वूमन्स विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा आज 12 जुलैला बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे आयोजित करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. तर टॅमी ब्यूमोंट हीच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 35 मिनिटांनी टॉस झाला आहे.
इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार टॅमीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड इंग्लंडसमोर 200 पेक्षा अधिक धावांचं आव्हान ठेवण्यात यशस्वी होणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
क्रांती गौडचं पदार्पण
टीम इंडियाकडून इंग्लंड विरूद्धच्या या सामन्यातून क्रांती गौड हीला टी 20i पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉसआधी क्रांतीला टीम इंडियाची कॅप देऊ संघात स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने क्रांती आणि हरमनप्रीत फोटो पोस्ट केला आहे.
दरम्यान मेन्स टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 6 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये दुसर्या कसोटीत 336 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती. त्यानंतर आता महिला ब्रिगेडला या मैदानात विजय मिळवण्याची संधी आहे. आता यात टीम इंडिया विजयी चौकार लगावण्यात यशस्वी ठरते का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, रिचा घोष (कर्णधार), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड आणि श्री चरणी.
इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफिया डंकले, डॅनिएल वायट-हॉज, माया बोचियर, टॅमी ब्यूमोंट (कर्णधार), एमी जोन्स (कर्णधार), पेज स्कॉलफिल्ड, सोफी एक्लेस्टोन, एम अर्लॉट, शार्लोट डीन, इस्सी वोंग आणि लिन्से स्मिथ.