भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामन्यात तीन दिवसांचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात दोन्ही संघांनी 387 धावांची खेळी केली. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांचा खेळ आता रोमांचक असणार हे निश्चित आहे. पण तिसऱ्या दिवशी शेवटच्या षटकात मैदानात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात इंग्लंडने 2 धावा करत विकेट न गमावता तंबूत परतले. तिसऱ्या दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाल्यानंतर फक्त 7 मिनिटांचा खेळ शिल्लक होता. त्यामुळे सलामी फलंदाज जॅक क्राउली आणि बेन डकेट यांनी खेळपट्टीवर वेळकाढूपणा सुरु केला. यानंतर गिल आणि क्राउली यांच्यात वाद झाला. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या वादात इंग्लंडला पाठिंबा दिला. नेमकं असं का ते समजून घ्या
शुबमन गिल आणि जॅक क्राउली वादात सुनील गावस्कर यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं की, सलामीच्या फलंदाजांकडे नाइटवॉचमॅनची सुविधा नसते. त्यामुळे संध्याकाळी फलंदाजी फलंदाजी करण्यापासून वाचू इच्छितात. यात त्यांना दोषी ठरवू नये. जसप्रीत बुमराहचा चेंडू लागल्यानंतर क्राउलीजवळ फिजियो बोलवण्याचा पूर्ण अधिकार होता. यात काही चुकीचं नाही. या दरम्यान सुनील गावस्कर यांनी आयपीएलमधील उदाहरण दिलं.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात समालोचन करताना सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये वाद होणं सहाजिक आहे. यासाठी कारण आहे. माझ्या माहितीनुसार इंग्लंडचे बहुतांश खेळाडू आयपीएल खेळत नाहीत. त्यामुळे त्यांचा वाद होत आहे. आयपीएल 2025 मध्ये जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक यासह काही खेळाडू नाहीत. त्यामुळे भारतीय खेळाडूंशी हवा तसा संवाद नाही. दुसरीकडे, इतर देशांचे खेळाडू भारतीय खेळाडूंसोबत एकत्र येतात. त्यांच्यासोबत वेळ घालवतात. यासाठी वाद होत नाहीत.
लॉर्ड्सच्या तिसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात भारतीय संघाचा संपूर्ण डाव 387 धावांवर आटोपला. इंग्लंडने दुसऱ्या डावात फक्त 7 मिनिटांचा खेळ केला. भारतीय संघ या दरम्यान दोन षटकं टाकू इच्छित होता. पण इंग्लंडचा ओपनर जॅक क्राउली आणि बेन डकेट यांना फक्त एकच षटक खेळायचं होतं. यासाठी जॅक क्राउली वेळकाढूपणा करत होता. यानंतर शुबमन गिल भडकला आणि वादाला फोडणी मिळाली.