मोठी बातमी! उड्डाणानंतर लगेच लागली आग, आणखी एक विमान एअरपोर्टजवळ कोसळलं
GH News July 14, 2025 02:04 AM

अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. अशातच आता ब्रिटनमधील साउथेंड विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच बीचक्राफ्ट बी200 हे छोटे प्रवासी विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान नेदरलँड्समधील लेलिस्टॅडला जात होते, मात्र उड्डाणानंतर त्याला आग लागली, व ते धावपट्टीजवळ कोसळले. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर विमान अचानक आगीच्या गोळ्यात बदलले. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये विमानातून धूर आणि ज्वाळा बाहेर निघत असल्याचे दिसत आहे. या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले ते धावपट्टीजवळ कोसळून मोठा आवाज झाला.

बचाव कार्य सुरू

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एसेक्स पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या विमानात किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मृतांची आणि जखमींच्या संख्येबाबत माहिती समोर आलेली नाही.

एसेक्स पोलिसांनी या घटनेबाबत एक अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, “साउथेंड विमानतळावर झालेल्या विमान अपघाताचे बचावकार्य सुरू आहे. आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अपघाताच्या कारणाचा तपास केला जाणार

या विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा अपघात तांत्रिक बिघाड किंवा इंजिन फेल झाल्यामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे. या अपघातानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी सध्या धावपट्टी बंद केली असून सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. आता या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि विमानतळाच्या वेबसाइटवर दिल्या जाणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.