भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी पंचांचे काही निर्णय वादग्रस्त ठरले. भारतीय संघाला या निर्णयांचा फटका बसला. डीआरएस (निर्णय पुनरावलोकन प्रणाली) नसती तर भारतीय संघाचे अधिक नुकसान झाले असते. पंच पॉल रायफल यांच्या निर्णयांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या सामन्यात त्यांच्या निर्णयामुळे भारतीय संघ एका क्षणी खूप संतप्त दिसला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताचे चार गडी बाद झाले असून 58 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 135 धावांची गरज आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव सुरु होता. 15 व्या षटकात ब्रायडन कार्सेच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिल याला कॅचआऊट देण्यात आले. या निर्णयाविरुद्ध गिल याने रिव्ह्यू घेतला. त्यामुळे त्याची विकेट वाचवली. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही. पण पंच पॉल रायफल यांनी वेळ न घेता त्याला बाद घोषित केले होते. रिप्लेनंतर पॉल रायफल यांना आपला निर्णय बदलावा लागला. पॉल रायफल यांची ही एकमेव चूक नव्हती. यापूर्वी इंग्लंडच्या डावातही त्यांनी भारताविरुद्ध निर्णय दिला होता.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही असाच प्रकार घडला होता. जेव्हा मोहम्मद सिराज याच्या चेंडूवर रूटविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील करण्यात आले. परंतु पंच पॉल रायफल यांनी रूट याला नॉट आऊट घोषित केले आणि टीम इंडियाने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की रूट खूप पुढे गेला होता आणि चेंडू थेट लेग स्टंपवर आदळला. यामुळे टीम इंडियाला विकेट मिळण्याची आशा होती. पण बॉल ट्रॅकिंगमध्ये असे दिसून आले की चेंडू फक्त लेग स्टंपला स्पर्श करत होता. यामुळे निर्णय पंचांकडे गेला. यावेळी समालोचन करणारे सुनील गावस्कर यांनीही बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित करत संतप्त भावना व्यक्त केल्या. पण पंचांच्या निर्णयामुळे रूट बचावला. तो भारतीय संघासाठी मोठा धक्का होता.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशी पंच सैकत शराफुद्दौला यांच्या निर्णयांवरून गोंधळ उडाला. भारताच्या पहिल्या डावात सैकत शराफुद्दौला याने आकाश दीपला त्याच्या पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आउट केले. परंतु डीआरएसमुळे तो बचावला. पुन्हा एका चेंडूनंतर असेच काहीसे घडले. त्यावेळीही आकाश दीप याला एलबीडब्ल्यू आउट घोषित करण्यात आले. पण आकाश याने पुन्हा एकदा डीआरएस करण्याचा निर्णय घेतला आणि तो नॉट आउट राहिला.