सुनील गावस्कर यांनी बुमराहवर साधला निशाणा? सुपरस्टार असा उल्लेख करत मारला टोमणा
GH News July 17, 2025 12:10 AM

तेंडुलकर अँडरसन कसोटी मालिकेतील तीन सामन्यांचा खेळ संपला आहे. या मालिकेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागणार आहे. हा सामना मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून खेळला जाणार आहे. असं असताना या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? याबाबत साशंकता आहे. कारण तिसऱ्या सामन्यातील निकालानंतर कर्णधार शुबमन गिल याने याबाबत स्पष्ट असं काही सांगितलं नाही. लवकरच कळेल असं सांगून हा प्रश्न टाळला होता. खरं तर या मालिकेत जसप्रीत बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे तीन सामने खेळणार हे स्पष्ट केलं होतं. त्यापैकी दोन सामने खेळला आहे. त्यामुळे शेवटचा सामना चौथा असेल की, पाचवा याबाबत काही स्पष्टता नाही. त्यावर आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडलं आहे.

मिडिया रिपोर्टनुसार सुनील गावस्कर यांनी सोनी स्पोर्ट्सशी बोलताना अप्रत्यक्षरित्य्या निशाणा साधला की, कोणत्याही सुपरस्टारने ब्रेक घेऊ नये. ते येथे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी आले नाहीत. सुनील गावस्कर यांचं विधान जसप्रीत बुमराह याच्यासाठी असल्याची आता चर्चा रंगली आहे. कारण ही मालिका सुरु होण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाने बुमराह फक्त तीन सामने खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळल्याने दुखापतग्रस्त झाला होता. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला होता. त्यामुळे त्याची काळजी घेत व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

जसप्रीत बुमराह तीन पैकी दोन सामन्यात खेळला. ज्या सामन्यात खेळला नाही तो सामना भारताने जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने पाच विकेट घेतले होते. त्यानंतर एजबेस्टन कसोटी सामन्यात खेळला नाही. लॉर्ड्स कसोटी सामन्यातही त्याने एका डावात पाच विकेट घेण्याची किमया साधली. आता मालिका पराभवाचं संकट भारतावर आहे. अशा स्थितीत त्याचं मँनचेस्टरमध्ये खेळणं खूपच आवश्यक आहे. कारण हा सामना भारताने गमावला तर पाचव्या सामन्याला तसाही काही अर्थ उरणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.