राज्यात गेल्या काही काळापासून मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे. मनसे आणि ठाकरे गटाने याबाबत आंदोलन देखील केलं आहे. विधीतज्ज्ञ गुणरत्न सदावर्तेंनी मनसे आणि ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या हिंदी सेलचे राज्य प्रमुख आणि महासचिव पारसनाथ तिवारी यांनी गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेतली. हिंदी भाषा वाचवण्यासाठी , संविधानच्या रक्षणासाठी , कायद्याच्या संरक्षणासाठी पारसनाथ यांनी सदावर्तेंची भेट घेतली. यानंतर बोलताना सदावर्ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
सदावर्ते जीवाची पर्वा न करता लढत आहेत – तिवारी
या भेटीनंतर बोलताना पारसनाथ तिवारी म्हणाले की, ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यात गुणरत्न सदावर्ते भारतीय संविधानाचं रक्षण करत आहेत. हिंदी विरोधात राजकारण करणाऱ्यांविरोधात मी जी भूमिका घेतली तशीच भुमिका गुणरत्न सदावर्ते घेत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे आधूनिक अब्राहम लिंकन आहेत. जीवाची पर्वा न करता ले लढत आहेत. राज्यात मराठी सक्तीची आहेच पण हिंदीचाही अपमान होता कामा नये.’
या भेटीनंतर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात. देशाची भाषा हिंदी आहे, पण भाषेच्या नावावर कापाकापी करू नये. पारसनाथ तिवारी आणि इतर विद्वानांनी माझा सन्मान केला आहे. यापुढे या राज्यात तिसरी भाषा शिकवली जाणार. हिंदी भाषा देशाची प्रिय भाषा आहे, कोकणात हिंदी भाषिक काम करतात. त्यामुळे हिंदी गरजेची आहे.’
हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर दोपहरचा सामना का चालवता?’
उद्धव ठाकरेंवर टीका करताना सदावर्ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंनी विनय शुक्ला हे हिंदी भाषेतील शिक्षक कुणाला हिंदी शिकवतात ते सांगावं. ते दोपहर का सामना चालवतात. लोकांना सांगतात हिंदी शिकू नका मग हिंदी भाषेचा पेपर का चालवता? हिंदी भाषेच्या नावावर कमाई करता. तुमचा पेपर वाचण्यासाठी हिंदी तर यायला हवी ना. त्यासाठी शोळेपासून हिंदी शिकणे गरजेचे नाही का? उद्धव ठाकरेंचा विचार दिशाभूल करणारा आहे. हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर दोपहरचा सामना का चालवता?’ असा सवाल सदावर्तेंनी विचारला आहे.
तिसरी भाषा कंपल्सरी केलीच पाहीजे. शासन निर्णय पुनश्च लागू करावा. ठाकरे बंधूंच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार आहे. राज्यात हिंदी शिकली जाईल आणि शिकवली जाईल असंही सदावर्ते यांनी सांगितले.