टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने लॉर्ड्स कसोटी सामन्यात खराब अंपायरिंगवरुन पॉल रॅफेल यांच्यावर निशाणा साधला आहे. इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी एकूण 14 विकेट्स पडल्या. या दरम्यान पंचांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले. अंपायर रॅफेल यांनी मोहम्मद सिराज याने केलेली एलबीडब्ल्यूची अपील नाकारली. मात्र डीआरएस अपीलमधून बॉल स्टंपवर हिट होत असल्याचं स्पष्ट झालं. मात्र अंपायर कॉलमुळे जो रुट याला जीवनदान मिळालं. त्यामुळे सिराजने अंपायरला ठसन दिली.
त्यानंतर रॅफेलने ब्रायडन कार्सने टाकलेल्या बॉलवर टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याला कॅच आऊट दिलं. मात्र डीआरसमधून गिलच्या बॅटला बॉल लागलाच नसल्याचं स्पष्ट झालं. अश्विनने यावरुन रॅफेलवर संताप व्यक्त केला. अश्विनने रॅफलेवर निशाणा साधताना त्यांनी टीम इंडिया विरोधात दिलेल्या निर्णयाचा उल्लेख केला. बॅट-बॉलमध्ये कार पार्क करु शकतो, असं अश्विनने शुबमनच्या निर्णयावरुन म्हटलं.
“पॉल रॅफेलसोबत माझा अनुभव. मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे. त्यांनी आऊट द्यावं, असं माझं म्हणणं नाही. जेव्हा टीम इंडियाची बॉलिंग असते तेव्हा त्यांना कायम बॅट्समन आऊट नाही असं वाटतं. तर टीम इंडियाची बॅटिंग असल्यावर त्यांना आऊट असल्याचं वाटतं. जर हे टीम इंडिया विरुद्ध नसून सर्व संघांबाबत असेल तर आयसीसीने याकडे लक्ष द्यायला हवं”, असं अश्विनने त्याच्या ‘अॅश की बात’ या युट्यूब चॅनेलवर म्हटलं.
“माझ्याकडे सेडान कार आहे. मी ही कार बॅट आणि बॉलमध्ये पार्क करु शकतो. हे स्पष्ट आहे की तो आऊट नव्हता. मात्र असं होण्याची ही काही पहिली वेळ नाही”, असं अश्विनने नमूद केलं.
“जेव्हा रॅफेल येईल तेव्हा भारत जिंकणार नाही, असं माझे वडील मला एकत्र मॅच पाहताना म्हणाले, असं अश्विने सांगितलं.
दरम्यान रॅफेलवर अश्विन व्यतिरिक्त भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि सुनील गावसकर या दोघांनीही रॅफेलवर टीकास्त्र सोडलं.