पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे. कॅरी ऑन परीक्षा घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते.यावर दोन दिवसात निर्णय घेऊ असे विद्यापीठाने सांगितल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.२०१९ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कॅरी ऑन / RE-EXAM ची विशेष संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ‘कॅरी ऑन’ आंदोलन पुकारण्यात आले होते.
कॅरी ऑन परीक्षा संदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही पुणे विद्यापीठाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आक्रमक होत शेकडो विद्यार्थ्यांनी आज पुणे विद्यापीठामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन हे विद्यार्थी कुलगुरूंना भेटण्यासाठी विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते.मात्र त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून रोखण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र झाल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गेट समोर जोरदार घोषणाबाजी करीत गेटवर चढून कुलगुरूंचे कार्यालय असलेल्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला.
कुलगुरूंनी आम्हाला भेटायला खाली यावं आणि आमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारावं ही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आणि विद्यार्थींनी मुख्य इमारतीच्या आवारात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका पाहून पुणे विद्यापीठाचे प्रभारी आंदोलन स्थळी भेटण्यासाठी दाखल झाले. कुलगुरू दिल्लीमध्ये असून युसीजीकडे विद्यापीठाचे शिष्टमंडळ गेलेले आहे.येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. मात्र विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम होते.
२०१९ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कॅरी ऑन / RE-EXAM विशेष संधी उपलब्ध करून देण्याबाबत कॅरी ऑन आंदोलन पुकारण्यात आले होते.बहुतांश महाविद्यालयांनी ६० टक्के विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सर्वांना माहिती झाली होती आणि काही कॉलेजेसने त्याचा गैरप्रकार चालू ठेवला होता. २०१९ अभ्यासक्रमाच्या शेवटच्या विद्यार्थ्यांना आपण २०२४ मध्ये समावेश करत असताना त्यांचे क्लासेस २०१९ या पॅटर्नने होणार का आणि त्यांच्या परीक्षा कोणत्या पॅटर्नने घेणार आहात हे विद्यापीठाकडून अजून ही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
एआयसीटी नुसार विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी कॅरी ऑन किंवा विशेष संधी सुविधा पाहिजेत विशेषत: अंतिम टप्प्यातील अभ्यासक्रमावर उदा. २०१९ पॅटर्न दिली पाहीजे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आपल्या विद्यापीठाकडे ग्रेस मार्क्समध्ये सात किंवा एनएसएस धरून १५ मार्क्स असे ग्रेस असतात, पण काही विद्यार्थ्यांना १८ किवा २५ त्याहून अधिक मार्क मिळतात ते कसे मिळतात त्यावर अजून ही विद्यापीठाकडून कोणतेही उत्तर आलेले नाही असेही विद्यार्थ्यांचे म्हणले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन दोन दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासन दोन दिवसानंतर काय निर्णय घेत हे पाहावं लागणार आहे.