भारतीय संघाने लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची मोठी संधी गमावली. भारताला तिसरा कसोटी सामना जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि 22 धावांनी निसटता पराभव झाला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला. या पराभवामुळे भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर पडला आहे. लॉर्ड्स कसोटीतील काही चुका टीम इंडियाला कारणीभूत ठरल्या. असं नेमकं काय झालं की भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चला जाणून घेऊयात पराभवाची कारणं…
शुबमन गिलचा दृष्टीकोन : टीम इंडियाच्या पराभवासाठी शुबमन गिलची वृत्ती कारणीभूत ठरली. मागच्या दोन सामन्यात शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने दोन्ही सामन्यात शतकी खेळी केली. पण तिसऱ्या कसोटीत त्याने धावा करण्याशिवाय सगळं केलं. इंग्लंडच्या फलंदाजांसोबत किंवा पंचाशी भांडताना दिसला. गिलने पहिल्या डावात 16 आणि दुसऱ्या डावात फक्त 6 धावा केल्या.
ऋषभ पंतची चूक : पराभवासाठी गिल इतका ऋषभ पंतही कारणीभूत ठरला आहे. पहिल्या डावात त्याने 74 धावांची खेळी केली होती. पण धावचीत झाला. केएल राहुलचं शतक व्हावं यासाठी त्याने धाव घेतली. त्याच्या या रणनितीने टीम इंडियाचं नुकसान झालं. अन्यथा पहिल्या डावात भारताने आघाडी घेतली असती. भारताने पहिल्या डावात इंग्लंड इतक्याच 387 धावा केल्या.
टीम इंडियासाठी 63 धावा पडल्या महागात : टीम इंडिया आक्रमक खेळत होती. पण आक्रमकतेमुळे भारतीय संघाची घसरगुंडी झाली. केएल राहुल, रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, शुभमन गिल, मोहम्मद सिराज हे सर्व इंग्लिश खेळाडूंशी भांडण्यात व्यस्त होते. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात 63 अतिरिक्त धावा दिल्या. याच धावा पराभवासाठी कारणीभूत ठरल्या.
केएल राहुलची चूक : पहिल्या डावात केएल राहुलने इंग्लंडचा यष्टीरक्षक जेमी स्मिथचा झेल सोडला होता. झेल सोडला तेव्हा तो फक्त 5 धावांवर होता. मात्र त्यानंतर त्याने 51 धावा केल्या. म्हणजेच 46 धावांचा फटका बसला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांपर्यंत मजल मारता आली.
त्या 4 विकेट्स : भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण भारताचा डाव 387 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात शेवटच्या चार विकेट अवघ्या 11 धावांवर गमावल्या. शेपटाच्या फलंदाजांनी हवं तसं योगदान दिलं नाही. त्यामुळे संघाचं नुकसान झालं.