नाशिक: नाशिकमधील कृष्णा डोंगरे या व्यक्तीच्या नावावरती नाशिकमध्ये बलात्कारासारख्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. या प्रकरणात राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे, त्याचबरोबर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या पोलिसांर आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर दावे केले आहेत. त्याचबरोबर राऊतांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे, मुख्यमंत्री कृष्णा डोंगरे या शेतकरी बांधवाचे प्रकरण गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करतो म्हणून मंत्री व नाशिक पोलीस यांनी बलात्कारासारख्या गुन्हात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्रात आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.
नाशिकमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे आणि मकोका दाखल केला. त्यांच्या कुटुंबाची समाज माध्यमावर बदनामी करतो म्हणून जाब विचारायला गेले तर त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डर असे गुन्हे दाखल केले. भाजपमध्ये जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारल्यावर ते गुन्हे पोलीस मागे घेतात किंवा थांबवतात. ते गुन्हे मागे घेतले जातात. या पोलिसांना वर्दी घालून मिरवण्याची लाज वाटली पाहिजे मग ते आयपीएस असो किंवा महाराष्ट्र सेवेचे पोलीस अधिकारी असो, त्यांना खाकी वर्दी घालून अशी कामे करायला लाज वाटली पाहिजे. या प्रकारे नाशिकमध्ये कृष्णा डोंगरेचे खोटा गुन्हा दाखल करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांचा हात आहे, कोणत्या मंत्र्याच्या दबावाखाली तुम्ही बलात्काराचे गुन्हे दाखल करता? कृष्णा डोंगरे हा कांदा प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत होता, तुम्हाला आठवत असेल त्याने आपल्या कांद्याचा शेत जाळलं होतं, त्यांनी अग्निकांड केलं, भाव मिळत नाही म्हणून त्यांनी स्वतःचा शेत जाळलं असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.
सरकारला त्यावर जबाब द्यावा लागला आणि कृष्णा डोंगरे याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवत आहात, त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे कोण करत आहे, हे कोणते अर्बन नक्षलवादी आहेत, हे डावे कडवे आहेत की तुमच्या धर्मांध उजवे कडवे आहेत? हा माझा देवेंद्र फडणवीस यांना, नाशिकचे पोलीस अधीक्षक नाशिकचे पोलीस आयुक्त यांना सवाल आहे, ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांना फक्त आरएसएसच्या कपड्यातच,त्या युनिफॉर्म वावरायच्या बाकी आहेत, तुम्हाला हे दिसत नाही का? राज्याच्या महासंचालकांनी शपथ घेतली आहे, सर्वांना समान न्याय द्यायची हे लक्षात ठेवा. कृष्णा डोंगरेचे प्रकरण साधे नाही, जो आमच्या विरोधात आवाज उठवेल त्याला अटेम्प्ट टू मर्डर बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात टाकू हा इशारा पोलीस देत आहेत, पोलीस कोणाचं काम करत आहेत? ते जनतेचे सेवक आहेत की भाजपचे सेवक आहेत? हे एकदा आम्हाला समजू द्या त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने सर्व पाहू, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री,
सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना भयंकर अशा खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. हाच प्रकार कृष्णा डोंगरे यांच्याबाबतीत घडला आहे. महाराष्ट्रातील अत्याचारग्रस्त शेतकऱ्याचा आवाज म्हणून मी डोंगरे यांना ओळखतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर डोंगरे यांनी अनेकदा निर्भयपणे आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही म्हणून नाशिकमध्ये कांद्याची होळी करण्याचे मोठे आंदोलन त्यांनी केले. सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केले, कांदा अग्निडाग समारंभासारखे अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रक्ताने लिहिलेली पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून डोंगरे यांनी संघर्ष सुरूच ठेवला.
मात्र पंतप्रधान मोदी हे नाशिक परिसरात आले तेव्हा त्यांच्या सभेत जाऊन कांदाप्रश्नी आंदोलन करण्याचे धाडस डोंगरे यांनी दाखवल्यापासून ते सरकारच्या नजरेत खुपू लागले. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील सभेत आंदोलन करून या शेतकऱ्याने भाजप सरकारची झोप उडवली. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी बलात्काराचे, विनयभंगाचे एक बनावट प्रकरण पोलिसांना हाताशी धरून रचण्यात आले. पोलीस व राजकरण्यांनी एका महिलेस हाताशी धरून डोंगरे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. खोट्या तक्रारीवर डोंगरे यांना कुटुंबासह उद्ध्वस्त करण्याच्या कारस्थानात भाजपचे मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी सामील होते. त्या कारस्थानामुळे डोंगरे यांना घर-कुटुंब सोडून परागंदा व्हावे लागले. भाजपासंबंधित शिक्षण संस्थाचालक व संस्थेत काम करणाऱ्या महिला शिक्षिकेने विनयभंगाची खोटी तक्रार केली. व त्याआधारे डोंगरे यांना अटक करण्याचे कारस्थान रचले. पण पोलिसांचे दुर्दैव असे की, ज्या खोट्या तक्रारीनुसार बलात्कार कांड घडले त्या तारखेला व त्या क्षणी डोंगरे हे घटनास्थळीच नव्हते, तर वणी येथे सप्तशृंगी गडावर धार्मिक कार्यासाठी गेले होते हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध झाल्याने भाजपचे मंत्री व पोलिसांचा बनाव उघड झाला.
एका शेतकरी आंदोलकाचा आवाज दडपण्यासाठी राज्याचे मंत्री, पोलीस अधिकारी इतक्या खालच्या पातळीवर गेले हे महाराष्ट्राच्या परंपरेला व प्रशासनाला शोभणारे नाही. कृष्णा डोंगरे यांच्या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी व राजकीय नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे कृष्णा डोंगरे यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल होतील किंवा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होईल अशी भीती मला वाटते. हे चित्र महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. लोकशाही व स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. डोंगरे यांच्यावर बलात्कारासारखे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खतम करण्याचे नक्सली’ कट । कारस्थान रचणाऱ्या अतिरेकी शक्तीवर जन सुरक्षा कायद्याने कारवाई करावी. कृष्णा भगवान डोंगरे (रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नावे लिहिलेला तक्रारीचा अर्ज पुराव्यासह जोडला आहे. सरकारकडे माणुसकी व कायद्याबाबत आदर शिल्लक असेल तर कृष्णा डोंगरे यांना न्याय मिळेल हे पहावे.
https://www.youtube.com/watch?v=titmfse7f6e
आणखी वाचा