भारताचा वरिष्ठ संघाला लॉर्ड्सवर पराभवाचं तोंड पाहावं लागलं. अवघ्या 22 धावांनी पराभव झाल्याने क्रीडाप्रेमींचं मन दुखावलं आहे. असं असताना अंडर 19 संघामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना काही अंशी दिलासा मिळाला आहे. बेकेनहममध्ये सुरु असलेल्या चार दिवसीय अंडर 19 कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात वैभव सूर्यवंशीने कमाल केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवला तर वैभव सूर्यवंशीचा सिंहाचा वाटा असणार आहे. वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी पहिल्या विकेटसाठी सहाहून अधिक इकोनॉमी रेटने धावा केल्या. दोघांनी मिळून 12 षटकात 77 धावा केल्या. आयुष म्हात्रे 32 धावा करून बाद झाला. त्यानंतर वैभवने विहान मल्होत्रासोबत भागीदारी करत 22 धावा जोडल्या. यावेळी वैभव सूर्यवंशीने 56 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 1 षटकार मारला.
वैभव सूर्यवंशीने 44 चेंडूंचा सामना करत 56 धावांची खेळी केली. पहिल्या डावात वैभवने 13 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या होत्या. दोन्ही डावात मिळून वैभव सूर्यवंशीने 70 धावांची खेळी केली. यात एकूण 13 चौकार-षटकार मारले.वैभव सूर्यवंशी या सामन्यातील पहिल्या डावात गोलदाजीही केली. त्याने 84 धावांवर खेळत असलेल्या इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि कर्णधार हमजा शेखला तंबूचा रस्ता दाखवला. वनडे मालिकेत शतक झळकावणाऱ्या थॉमसची विकेटही घेतली.वैभवने 13 षटके गोलंदाजी केली यात त्याने दोन निर्धाव षटके टाकली आणि एकूण 35 धावा देत 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये 71 च्या सरासरीने 355 धावा केल्या. यादरम्यान त्याने 30 चौकार आणि 29 षटकार मारले. भारताने दुसऱ्या डावात 250 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. भारताने 300 पर्यंत मजल मारली आणि त्यांचे विकेट झटपट काढले तर नक्कीच विजयी ठरेल. भारताच्या 19 वर्षांखालील संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आधीच 3-2 अशी जिंकली आहे. आता जर त्यांनी पहिली कसोटी जिंकली तर ते येथेही 2 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेऊ शकतात.