Rohit Pawar : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मूळचे साताऱ्याचे आहेत. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी मला जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती खासदार शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. दरम्यान, आता लवकरच शरद पवारांच्या पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे, समोर आले आहे. विशेष म्हणजे यावेळी पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध चालू असायचे, असे म्हटले जाते. त्यामुळेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावर असेपर्यंत रोहित पवार यांना कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे माझ्यावर काही जबाबदारी सोपवली पाहिजे, अशी आशाही त्यांनी याआधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. त्यानंतर आता लवकरच शरद पवार त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसांत मोठी खांदेपालट होणार आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता लवकरच पक्षाचे सचिव (जनरल सेक्रेटरी) म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
रोहित पवार यांना पक्षात सचिवपद मिळणार असल्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार? महत्त्वाच्या पदावर पवार कुटुंबातील नेत्याची नेमणूक झाली तर पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी सर्वांचेच आभार मानले आहेत. मी या काळात पक्षवाढीसाठी काम करणार आहे. तसेच पक्ष पुन्हा नव्याने सत्तेत यावा यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करेन. अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.