बांगलादेशात जमात-ए-इस्लामी आता बीएनपीला संपवून इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याची योजना आखत आहे. जमात-ए-इस्लामीने आपला जुना मित्रपक्ष बीएनपीवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, “आधी बीएनपीच्या गुंडांना देशभरात धुमाकूळ घालू द्या आणि रस्त्यावर अराजक माजवू द्या, ज्यामुळे बीएनपीविरोधात जनक्षोभ आणि संताप निर्माण होईल आणि नंतर भयानक घटना घडवून बीएनपीवर बंदी घालावी, ” अशी योजना असू शकते.”
बांगलादेशातील शेख हसीना विरोधी शक्ती आता एकमेकांच्या विरोधात जात आहेत. शेख हसीना यांच्याविरोधात कट रचण्यात यशस्वी झाल्यानंतर आता बांगलादेशचा कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामी देशात इस्लामी राजवटीची तयारी करत आहे. त्यासाठी जमातने देशातील दुसरा मोठा पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (बीएनपी) संपवण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
जमात-ए-इस्लामीने आपला जुना मित्रपक्ष बीएनपीवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात जमातची विद्यार्थी संघटना छात्र शिबीर आणि हिंसक कारवायांसाठी कुख्यात असलेल्या बीएनपीच्या विद्यार्थ्यामध्ये हाणामारी झाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमात-ए-इस्लामी बीएनपीला टार्गेट करण्याचा, त्यावर बंदी घालण्याचा आणि देशाची सूत्रे ताब्यात घेण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढाका विद्यापीठाच्या वसतिगृह आणि महाविद्यालयांमधून बीएनपी विद्यार्थी संघटनेचे सदस्य आणि नेत्यांना बाहेर काढण्यात आले आहे. हा सुनियोजित योजनेचा भाग असू शकतो. ‘
सूत्रांनी सांगितले की, “आधी बीएनपीच्या गुंडांना देशभरात धुमाकूळ घालू द्या आणि रस्त्यावर अराजक माजवू द्या, ज्यामुळे बीएनपीविरोधात जनक्षोभ आणि संताप निर्माण होईल आणि नंतर भयानक घटना घडवून बीएनपीवर बंदी घालावी, अशी योजना असू शकते.” ‘
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशचा प्रमुख पक्ष बीएनपी देशात लवकर सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. बीएनपीच्या या मागणीमुळे हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जमात-ए-इस्लामीही लवकर निवडणुका घेण्याच्या बाजूने नाही आणि निवडणुकीपूर्वी सुधारणा पूर्ण करण्यासाठी युनूसवर दबाव टाकत आहे. किंबहुना सुधारणेच्या नावाखाली जमात आणि बांगलादेशातील इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना निवडणुकांशिवाय सत्ता उपभोगायची आहे, ज्याचा युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आता येत्या काळात बांगलादेशात नेमकं काय होतं, पुन्हा कुणाचं सरकार येतं, की शेख हसीना देशात परतून पुन्हा सरकार स्थापन करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.