भारताने तिसरा कसोटी सामना हातातून गमावला असंच म्हणावं लागेल. कारण एका बाजूने अष्टपैलू रवींद्र जडेजा झुंज देत होता. तर दुसऱ्या बाजूला धडाधड विकेट पडत होत्या. त्यामुळे 193 धावांचं सोपं लक्ष्य गाठताना टीम इंडियात 170 धावांपर्यंत मजल मारू शकली. भारताचा 22 धावांनी निसटता पराभव झाला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण पहिल्या सत्रातच भारताच्या दिग्गज खेळाडूंनी नांगी टाकली आणि विजय दूर गेला. कोट्यवधि चाहत्यांचा लॉर्ड्सवर विजयाच्या अपेक्षा होत्या. पण पराभवामुळे मन दुखावलं. इतकंच काय तर दिग्गज खेळाडूंचाही भ्रमनिरास झाला. माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. टीम इंडियाच्या पराभवानंतर सचिन आणि गांगुली चाहत्यांप्रमाणे निराश झाले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक्सवरील पोस्टमध्ये या पराभवाबाबत आपलं मत मांडलं आहे. सचिन तेंडुलकरने एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं की, , “जरी ते खूप जवळचे होते, तरी विजय खूप दूर आहे. जडेजा, बुमराह, सिराज यांनी शेवटपर्यंत लढा दिला. टीम इंडियाने चांगले प्रयत्न केले. इंग्लंडनेही दबाव कायम ठेवला आणि त्यांना हवे असलेले निकाल मिळवले. कष्टाने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन.”
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीने लिहिलं की, “किती छान कसोटी सामना! लॉर्ड्सवरून भारत खूप निराशा घेऊन परतणार आहे. तीन कसोटी सामन्यांमध्ये चांगले खेळूनही ते 2-1 ने पिछाडीवर आहेत. हा सामना जिंकणे आवश्यक होते. जडेजाने उत्तम लढा दिला आणि 193 धावांचे लक्ष्य मोठे नव्हते हे सिद्ध केले,”
भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात खोऱ्याने धावा केल्या पण गोलंदाजांनी माती केली. दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत सामना जिंकून दाखवला. तर तिसऱ्या सामन्यात फलंदाज पूर्णपणे फेल गेले. यशस्वी जयस्वाल, करुण नायर, नितीश रेड्डी, शुबमन गिल, ऋषभ पंत या सर्वांनी निराशा केली.