Tesla Cars Price in India: इलॉन मस्क आपली ई-कार कंपनी टेस्लाच्या गाड्या भारतातही विकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होते. मंगळवारी म्हणजे आज टेस्लाने मुंबईत आपले पहिले शोरूम उघडून हे स्वप्न पूर्ण केले. पण, अडचण अशी आहे की, भारतात लाँच झालेल्या टेस्लाच्या मॉडेल्सची किंमत अमेरिकेच्या बाजारपेठेपेक्षा खूप जास्त आहे. भारतात या गाड्या इतक्या महाग का विकल्या जात आहे? याविषयीची संपूण माहिती पुढे वाचा.
टेस्लाच्या सर्वात लोकप्रिय मॉडेल Y बद्दल बोलायचे झाले तर भारतात याची किंमत अमेरिकन बाजारपेठेपेक्षा 15,000 डॉलर जास्त आहे. अमेरिकेत या मॉडेलची किंमत 44,990 डॉलर (जवळपास 38.7 लाख रुपये) आहे, तर भारतीय बाजारात याची किंमत 15,000 डॉलरने वाढून 59.89 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत आहे. मुंबईतील याची ऑन रोड किंमत पाहिली तर ती सुमारे 61 लाख रुपये आहे, जी अमेरिकन बाजारापेक्षा सुमारे 22 लाख रुपये महाग आहे.
भारतात आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक कारची गणना पूर्णपणे तयार उत्पादने म्हणून केली जाते. अशा उत्पादनांवर आयात शुल्क 60 ते 100 टक्क्यांपर्यंत असते. कारच्या किंमतीत वाढ होण्यात या कराचा सर्वाधिक वाटा आहे. चीनबद्दल बोलायचे झाले तर टेस्लाच्या Y मॉडेलची किंमत जवळपास 46 लाख रुपये आहे, तर युरोपियन मार्केटमध्ये या मॉडेलची किंमत जवळपास 46 लाख रुपये आहे.
टेस्लाच्या इतर मॉडेल्सच्या किमतीतही लक्षणीय वाढ होते. टेस्लाच्या मॉडेल 3 ची किंमत अमेरिकेत जवळपास 30 लाख रुपये आहे, परंतु आयात शुल्कानंतर ती भारतात 35 ते 40 लाख रुपये होते. याशिवाय टेस्लाच्या गाड्या महाग होण्यामागे इतरही कारणे आहेत. या कारमध्ये प्रीमियम क्वॉलिटी बॅटरी, इंटिरिअर आणि टेक्नॉलॉजी असल्याने त्याची किंमत वाढते.
आयात शुल्काव्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारचे कर भारतात लादले जातात. यात रोड टॅक्स, इन्शुरन्स आणि स्थानिक करांचाही समावेश आहे. या गोष्टींची सांगड घातल्यास वाहनांची ऑन रोड किंमत बरीच जास्त होते. भारतात आयात शुल्क 15 ते 20 टक्क्यांनी कमी केले तरी येथे आयात होणाऱ्या गाड्यांच्या किमती चढ्याच राहतील. टेस्लाबद्दल बोलायचे झाले तर त्याची सर्वात कमी किंमतीची कारही 35 ते 40 लाख रुपये असेल, तर भारतात टाटा, ह्युंदाई आणि एमजी ई-कार 20 ते 30 लाख रुपयांच्या रेंजमध्ये येतात.
टेस्लाच्या कारची किंमत डॉलरमध्ये निश्चित केली जाते, कारण त्याचे बहुतांश उत्पादन अमेरिकेत होते. अशा तऱ्हेने जेव्हा ही कार भारतात येते तेव्हा त्याची किंमत रुपयात बदलते. या एक्स्चेंजसाठी किंमतही मोजावी लागते, तर डॉलरच्या मजबुतीमुळे रुपयावरील दबावही वाढतो. भविष्यात टेस्लाने भारतात उत्पादन सुरू केल्यास त्याच्या किमती कमी होऊ शकतात.