प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी संताप; अजितदादांची भेट घेत जखमीनं ‘तो’ थरारक प्रसंग सांगितला, म्हण
Marathi July 16, 2025 11:25 AM

सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावरती 13 जुलै रोजी हल्ला झाला त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. काल (मंगळवारी, ता-15) अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सोलापूर दौऱ्यावरती आले होते,यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यानी अजित पवारांची भेट घेतली. त्याचबरोबर दीपक काटे व त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आम्ही जर आडवे आले नसतो तर प्रविण गायकवाडांचा खून केला असता असा आरोप करत जखमी कार्यकर्त्यांने अजित पवारांना भेटून घडलेला तो थरारक प्रसंग देखील सांगितला आहे. संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे आणि जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी प्रवीण गायकवाड यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता शाई फेकणाऱ्याना विरोध करत होते. त्यावेळी शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी आणि कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना सोडून शिरीष जगदाळे आणि संभाजी भोसले यांना बेदम मारहाण केली.

संभाजी भोसले आणि शिरीष जगदाळेंनी सांगितला थरारक तो प्रसंग

रविवारी 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट (जि, सोलापूर) याठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या विरोधात शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की करत शाईफेक केली होती. त्यावेळी शिरीष जगदाळे आणि संभाजी भोसले यांनी दीपक काटे व त्याच्या साथीदारांचा जबरदस्त विरोध केला होता. प्रवीण गायकवाड यांना मारहाण करणारा जमाव प्रवीण गायकवाड यांना सोडून या दोघांना मारहाण करू लागला. यावेळी संभाजी भोसले (जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड) यांना खाली पाडून तुडवण्यात आलं. शिरीष जगदाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केली. हा थरारक प्रसंग संभाजी भोसले आणि शिरीष जगदाळे यांनी सांगितलं. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे अन् दीपक काटे यांच्यात संभाषण झाल्याचाही दावा केला आहे.

नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध, संभाजी ब्रिगेड आक्रमक

प्रविण गायकवाड यांच्यावरील केलेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी या हल्ल्याविरोधात निदर्शने केले जात असून संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी गायकवाड हे अक्कलकोट येथील कमलाराजे चौक येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांच्या तोंडाला काळे फासून, शाई मारून, मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांपैकी आरोपी शिवधर्म प्रतिष्ठानचा अध्यक्ष दीपक काटे, भुनेश्वर शिरगुरे या दोघांना ताब्यात घेतले.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.