शेजारी बसा…नको नको…ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं, शिंदेंच्या त्या कृतीची चर्चा!
GH News July 16, 2025 09:08 PM

Uddhav Thackeray And Eknath Shinde : सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आज (16 जुलै) अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपला. त्यांच्या निरोप समारंभावेळी विधानपरिषदेत सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी भाषणं केली. तसेच त्यानंतर फोटोसेशनही झाले. पण याच फोटोसेशनदरम्यान घडलेल्या एका प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसणे टाळले आहे. त्यांच्या याच कृतीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या येण्याची वाट पाहात होते

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेना पक्षाची दोन शकलं झाली. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे हो दोन्ही महत्त्वाचे नेते एकमेकांचे क्क्टर विरोधक झाले आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. दरम्यान, आता फोटोसेशनवेळीह त्यांच्यातील एकमेकांविषयीची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. फोटोसेशनसाठी सर्वच आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती उपस्थित होते. सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या येण्याची वाट पाहात होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आपापल्या आसनांवरून उठवू त्यांचा सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेदेखील त्यांच्या आसनावरून उठल्याचे दिसले.

एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्याची विनंती केली, पण…

उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांना सर्वच नेते समोरच्या रांगेत बसण्याची विनंती करू लागले. यावेळी फोटोसेशनसाठी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांना पाहताच त्या आपल्या आसनावरून उठल्या आणि त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शेजारी बसण्यास नकार दिला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे दुसऱ्या खुर्चीवर बसायला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीदेखील नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहात त्यांना नेमून दिलेल्या आसनावर बसण्याची विनंती केली. त्यानंतर नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान असलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसल्या.

फडणवीसांशी संवाद, पण…

दरम्यान, फोटोसेशनवेळी घडलेल्या याच प्रकाराची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. पण एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं तसेच त्यांच्या शेजारीही बसणं टाळलं. त्यामुळे फोटोसेशनदरम्यान घडलेल्या याच प्रकाराची सगळीकडे चर्चा होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.