भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात निराशा केली. यामुळे मालिकेत 1-2 ने पिछाडीवर पडला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारताकडून काही खेळाडूंनी निराशा केली आहे. त्यामुळे या मालिकेनंतर त्यांचं संघात पुन्हा खेळणं कठीण असल्याचं दिसत आहे. भारताने ही मालिका गमावली तर पाच खेळाडूंवर गच्छंतीची टांगती तलवार असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौरा झाल्यानंतर खेळाडूंच्या कारकिर्दीचा निर्णय होत असल्याचं आपण पाहीलं आहे. त्यामुळे इंग्लंड कसोटी मालिकेनंतर पाच खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. चला जाणून घेऊयात या खेळाडूंमध्ये कोण कोण आहेत ते…
करुण नायर: देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात आठ वर्षानंतर स्थान मिळालं. पण या संधीचं सोनं करण्यात त्याला अपयश आलं. त्याच्या क्रमवारीतही उलथापालथ केली. पण त्याला तीन सामन्यांच्या सहा डावात एकही अर्धशतक ठोकता आलं नाही.तीन सामन्यांच्या सहा डावात 21 च्या सरासरीने आणि 57 च्या स्ट्राईक रेटने 131 धावा केल्या. इतक्या खराब कामगिरीनंतर करुणला मँचेस्टरमध्ये संधी मिळणे कठीण होईल. इतकंच काय तर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळणेही कठीण होईल.
प्रसिद्ध कृष्णा: प्रसिद्ध कृष्णा याला इंग्लंड दौऱ्यात संदी मिळण्याचं कारण म्हणजे त्याची उंची आणि आयपीएल 2025 मधील उत्कृष्ट कामगिरी… पण या मालिकेत त्याच्या गोलंदाजीमुळे निराशा पदरी पडली आहे. प्रसिद्ध यांनी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या पदार्पणाच्या सामन्यात भरपूर धावा दिल्या होत्या. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये त्याची कामगिरी त्याच्या पदार्पणाच्या सामन्याइतकीच वाईट होती. दोन सामन्यांमध्ये 4 डावात 55 च्या सरासरीने आणि पाचच्या इकॉनॉमीने एकूण 6 विकेट्स घेतल्या. तसेच 331 धावा दिल्या.
नितीश कुमार रेड्डी: नितीश कुमार रेड्डीला टीम इंडियामध्ये संधी मिळाली ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे… त्यांनी तिथे विकेट घेतल्या. फलंदाजीतही त्यांनी चांगले योगदान दिले. पण इंग्लंड दौऱ्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. दोन सामन्यामधील तीन डावात 37 आणि 3 इकॉनॉमीने 3विकेट्स घेतल्या. तसेच 168 धावाही दिल्या. फलंदाजीत फक्त 45 धावा काढल्या.
शार्दुल ठाकूर: अष्टपैलू शार्दुल ठाकूरनेही इंग्लंड दौऱ्यात निराशा केली. शार्दुल शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. गोलंदाजीत त्याने दोन बळी घेतले. दरम्यान, पाचच्या इकोनॉमीसह धावा दिल्या.
हर्षित राणा: इंग्लंड दौऱ्यासाठी पहिल्या कसोटीपूर्वी हर्षित राणालाही टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पण त्याला सोडून देण्यात आलं. या निर्णयावरून स्पष्ट होते की हर्षितला सध्या टीम इंडियाच्या कसोटीत स्थान नाही. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आणि एकूण 4 विकेट्स घेतल्या.