येमेनच्या तुरुंगात बंद असलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाला आज 16 जुलै रोजी फाशी होणार होती. पण करेळचे ग्रँड मुफ्ती शेख कांथापुरम एपी अबूबकर मुस्लियार यांच्या हस्तक्षेपामुळे सध्या ही फाशी टळली आहे. इस्लाममध्ये पीडित कुटुंबाला मारेकऱ्याला माफ करण्याचा अधिकार आहे असं मुफ्तीने सांगितलं. पीडित कुटुंबासोबत चर्चेचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे निमिषाची क्षमा याचना मंजूर होऊन तिला माफी मिळू शकते.
अबूबकर म्हणाले की, “इस्लाममध्ये एका असा कायदा आहे, जो पीडित कुटुंबाला मारेकऱ्याला माफ करण्याचा अधिकार देतो” पीडिताच्या कुटुंबाची इच्छा असेल, तर मारेकऱ्याला माफी मिळू शकते. ते म्हणाले की, “मी पीडित कुटुंबाला ओळखत नाही. त्यांनी येमेनच्या विद्वानांशी संपर्क साधला व त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करण्याचा आग्रह धरला” इस्लाम मानवतेला महत्त्व देणारा धर्म असल्याच अबूबकर यांनी सांगितलं.
पडद्यामागे काय घडलं?
निमिषा प्रियाच्या प्रकरणात तिला 16 जुलैला फाशी होणार हे जवळपास निश्चित होतं. तिची फाशीची शिक्षा टळण्याची खूप कमी शक्यता होती. या सगळ्या प्रकरणात केरळच्या ग्रँड मुफ्तीच्या प्रयत्नांना यश मिळालं. ग्रँड मुफ्ती कंथापुरम यांच्यानुसार त्यांनी येमेनी इस्लामी विद्वानांशी हस्तक्षेप करण्यासाठी संपर्क साधला. या विद्वानांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला जे शक्य होईल, ते सर्व करु असं येमेनी विद्वानांनी सांगितलं. आता फाशीची तारीख टळली आहे. त्यामुळे पीडित कुटुंबासोबत चर्चेचा एका मार्ग मिळाला आहे.
येमेनी सरकारच पत्र
ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेता कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांनी आपल्या इंस्टा हँडलवर येमेनी सरकारच एक पत्र सुद्धा शेअर केलय. यात अरबी भाषेत लिहिलय की, “अटॉर्नी जनरलच्या निर्देशानुसार निमिषा प्रियाच्या मृत्यूच्या शिक्षेवर बुधवारी 16 जुलै 2025 रोजी अमलबजावणी होणार होती. ती शिक्षा स्थगित झाली आहे”
“मी केंद्र सरकारला माझ्याकडून सुरु झालेली चर्चा आणि प्रक्रियेबद्दल सूचित केलय. मी पंतप्रधान कार्यालयाला सुद्धा एक पत्र पाठवलं आहे” असं मुफ्तींनी सांगितलं.
फाशीची शिक्षा कधी सुनावली?
निमिषा प्रिया मूळची केरळची आहे. तिचं कुटुंब आजही इथे राहतं. प्रियाला बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 2020 साली येमेनी न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. 2023 साली सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिची माफीची याचिका फेटाळून लावली.