वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेचं चौथं पर्व सुरु झालं आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी नऊ संघांची शर्यत सुरु आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी चांगली ठेवण्यासाठी संघांची धडपड सुरु आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला पराभूत करत इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के होती. श्रीलंकेसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होती. मात्र हे सुख फक्त दोन दिवसच अनुभवता आलं आहे. कारण स्लो ओव्हर रेटचा इंग्लंडला फटका बसला आहे. संथ गतीने गोलंदाजी केल्याने इंग्लंडचे दोन गुण कापले गेले आहेत. तसेच संघाच्या सामना फीमधून 10 टक्के दंड भरावा लागणार आहे. कर्णधार बेन स्टोक्सने ही चूक कबूल केली आहे. आयसीसी नियमानुसार, प्रत्येक कमी टाकलेल्या एका षटकासाठी खेळाडूंच्या सामन्याच्या शुल्कापैकी 5 टक्के रक्कम कापली जाते. तसेच, प्रत्येक षटकासाठी 1 डब्ल्यूटीसी गुण कापला जातो. त्यामुळे इंग्लंडचे विजयी गुण 24 वरून 22 झाले आहेत. त्याचा थेटच परिणाम विजयी टक्केवारीवर झाला असून 61.11 टक्के झाले आहेत. म्हणजेच दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
इंग्लंडने आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात एकदाही अंतिम फेरी गाठलेली नाही. मागच्या पर्वातही इंग्लंडला स्लो ओव्हर रेटचा फटका बसला होता. दुसरीकडे, भारतीय संघाने दुसरा सामना गमावल्याने विजयी टक्केवारीत घट झाली आहे. 50 टक्क्यावरून थेट 33.33 टक्क्यांवर घसरण झाली आहे. मात्र जमेची बाजू अशी की स्लो ओव्हर रेट वगैरे असा काही प्रकार केलेला नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात दिलासा मिळला आहे. भारतापुढे आता मालिका वाचवण्याचं आव्हान असणार आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारत 1-2 ने पिछाडीवर आहे.
भारताने चौथा कसोटी सामना जिंकला तर भारत गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी पोहोचेल. भारताची विजयी टक्केवारी 33.33 वरून थेट 50 टक्के होईल. तर इंग्लंडची विजयी टक्केवारी 45.83 टक्के होईल. पण सामना ड्रॉ झाला तर भारताच्या विजयी टक्केवारीवर काही परिणाम होणार नाही. भारताची विजयी टक्केवारी 33.33 टक्के राहील. पण इंग्लंडची विजयी टक्केवारीत घट होऊन 61.11 टक्क्यावरून थेट 54.17 टक्क्यांवर येईल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीवर 3-0 ने व्हाईट वॉश दिला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 100 आहे. तर श्रीलंकने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. एक सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारी 66.67 टक्के आहे. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 33.33 टक्के आहे. वेस्ट इंडिजने तिन्ही सामने गमावल्याने विजयी टक्केवारी ही शून्य आहे.