यजमान इंग्लंडने लॉर्ड्स ग्राउंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील रंगतदार झालेल्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियावर 22 धावांनी मात केली. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. टीम इंडियाच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी 193 धावांचा पाठलाग करताना निराशा केली. तर रवींद्र जडेजा याने शेपटीच्या खेळाडूंसह चिवट बॅटिंग करत भारताच्या आशा अखेरपर्यंत कायम ठेवल्या. मात्र इंग्लंडने टीम इंडियाला 22 धावांआधी रोखलं आणि सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखलं.
अनेक आजी माजी खेळाडूंनी इंग्लंड क्रिकेट टीमचं या विजयानंतर कौतुक केलं. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज फलंदाज ज्योफ्री बॉयकॉट यांनी इंग्लंडच्या फलंदाजांबाबत कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्ट शब्दात कानउघडणी केली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमकपणे खेळताना बक्षिस म्हणून विकेट्स देणं बंद करायला हवं, असं बॉयकॉयट यांनी म्हटलं. तसेच त्यांनी झॅक क्रॉली आणि ओली पोप यांनाही चांगलंच सुनावलं आहे.
“मुर्खपणा बंद करा आणि आक्रमकपणे फटकेबाजी करुन विकेट गमावू नका, कारण खेळाडू आणखी चांगली कामगिरी करु शकतात. इंग्लंडला तुमच्याकडून अधिक अपेक्षा आहेत. हेड कोच ब्रँडन मॅक्युलम यानेही नुकतंच म्हटलं होतं की इंग्लंड बॅझबॉलबाबत फार बोलत नाही. तसेच इंग्लंडला बॅटिंगमध्ये सुधार करण्याची गरज आहे. त्यामुळे कोणतंही कारण चालणार नाही”, असं ज्योफ्री बॉयकॉट यांनी डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातील स्तंभलेखात म्हटलं आहे.
“इंग्लडंच्या खेळाडूला आणखी किती संधी देण्यात येणार? तो 57 कसोटी सामन्यांमधून काहीच शिकला नाही. पहिल्या डावात तो मागे आऊट झाला. तर दुसऱ्या डावातही त्याने खराब फटका मारला. तो अनेकदा असाच आऊट झाला आहे. त्याने 5 शतकं केली आहेत. तर 31 ची सरासरी जी फार वाईट आहे. आता त्याला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे”, असं बॉयकॉट यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय.
“त्याने फार चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर तो मोठी खेळी करु शकला नाही. त्याने परिस्थितीनुसार खेळायला हवं. कॅप्टन आणि कोचला जसं वाटतं तसंच खेळायला हवं असं गरजेचं नाही. जो रुटला पाहा, त्याला जे करायचं तो ते करतो आणि धावा काढतो. म्हणूनच तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. पोपने ही बाब समजायला हवी”, असंही बॉयकॉट यांनी नमूद केलं.