नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी विविध देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर परस्पर शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प विविध देशांवर टॅरिफ लादत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करारासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यामुळं भारतावर 20 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू शकते, अशी शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जपान, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिनया, दक्षिण आफ्रिका या देशांवर टॅरिफ लादल्यासंदर्भात पत्र ट्रम्प यांनी पाठवली आहेत. एका रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी 150 हून अधिक देशांना टॅरिफ लेटर पाठवणयाची तयारी केली आहे. यासंदर्भातील माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचं धोरण आक्रमकपणे पुढं नेलं आहे. ट्रम्प यांनी आता 150 देशांवर टॅरिफ लागू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील 150 देशांना टॅरिफ लावण्यासंदर्भातील सूचना देण्याचे संकेत दिले आहेत. 150 देशांवरील टॅरिफ 1 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जाऊ शकतात. रिपोर्टनुसार टॅरिफ लेटरचा वापर अमेरिका त्यांच्या अटींवर इतर देशांसोबत व्यापारी करार करण्यासाठी करत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की ज्या 150 देशांना टॅरिफ लेटर पाठवण्याचा विचार केला जात आहे. त्या देशांवर 10 ते 15 टक्के टॅरिफ लादलं जाणार आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं की आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. नव्या यादीतील देश हे मोठे देश नसल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि यूरोपियन यूनियन वरील टॅरिफ संदर्भात संकेत दिले. आगामी काळात यूरोपियन यूनियन सोबत आगामी काळात व्यापारी करार होऊ शकतो. मात्र, कॅनडावर लादलेल्या टॅरिफचा काय परिणाम होईल हे माहिती नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं. यामुळं कॅनडावर लादण्यात आलेलं 35 टक्के टॅरिफ कायम राहू शकतं.
अमेरिकेचं अध्यक्षपद दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ लादण्याचं नियोजन केलं आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारी कराराबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा अद्याप अंतिम तोडग्यापर्यंत पोहोचलेली नाही. 1 ऑगस्टपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार अंतिम होतो का ते पाहावं लागेल.
आणखी वाचा