ENG vs IND : जसप्रीत बुमराह मँचेस्टर टेस्टमध्ये खेळणार की नाही? अखेर ठरलं!
GH News July 17, 2025 08:12 PM

भारतीय कसोटी क्रिकेट संघाला इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 22 धावांनी पराभूत व्हावं लागलं. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये अंत्यत चुरशीच्या लढतीत भारताचा अखेरच्या क्षणी पराभव झाला. इंग्लंडने दिलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव हा 170 धावांवर आटोपला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर त्याआधी मालिकेत कायम राहण्यासाठी कोणत्याही स्थितीत चौथ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे चौथा कसोटी सामना भारतासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

उभयसंघातील चौथा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बुमराह 2 सामने खेळला आहे. त्यामुळे बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की पाचव्या? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

बुमराह लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. त्यानंतर बुमराहला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. तर बुमराहने तिसऱ्या सामन्यातून कमबॅक केलं. “बुमराह कोणत्या 3 सामन्यात खेळणार हे आम्ही परिस्थितीनुसार ठरवू”, असं हेड कोच गौतम गंभीर याने काही आठवड्यांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. तिसर्‍या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया बॅकफुटवर गेली आहे. त्यामुळे बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत नक्की काय समोर आलंय? हे जाणून घेऊयात.

बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही?

रेवस्पोर्ट्सनुसार, बुमराह मँचेस्टर टेस्टसाठी उपलब्ध आहे. बुमराहने आतापर्यंत या मैदानात एकही सामना खेळलेला नाही. बुमराहने तिसऱ्या कसोटीत एकूण 7 विकेट्स घेतल्या. तसेच बुमराहने पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मात्र बुमराहला दुसऱ्या डावात एकही विकेट घेता आली नव्हती.

आता बुमराह चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मँचेस्टरमध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाजांसह फलंदाजांनाही आणखी जोर द्यावा लागणार, हे मात्र निश्चित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.