वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या मायदेशात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश केला. त्यानंतर आता उभयसंघात 20 ते 28 जुलैदरम्यान 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान या दौऱ्यात विंडीज विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र या दरम्यान पाकिस्तानने वेस्ट इंडिजला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विंडीजसमोर एक नवी अट ठेवली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अट मान्य न केल्यास मालिका रद्द करण्यात येईल, अशी धमकी पीसीबीकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या या दौऱ्याला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र आता हा दौरा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानला विंडीज विरुद्ध वनडे सीरिज खेळायचं नाही. पीसीबीने याबाबतची माहिती विंडीज क्रिकेट बोर्डाला दिली आहे.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात प्रत्येकी 3-3 सामन्यांची टी 20i आणि एकदिवसीय मालिका नियोजित आहे. मात्र आता पाकिस्तानला विंडीज विरुद्ध केवळ टी 20i मालिकाच खेळायची आहे. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.
क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, पीसीबीने विंडीजला कथित धमकी दिली आहे. त्यानुसार विंडीज क्रिकेट बोर्डाने ऑगस्टमध्ये वनडेऐवजी टी 20i मालिका खेळण्यास सहमती न दर्शवल्यास दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल, असं पीसीबीने म्हटलं आहे. तर “वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही”, असं विंडीज क्रिकेट बोर्डाने ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे हा दौराच रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान टी 20i मालिकेसाठी आग्रही आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका टी-20 मालिकेत रूपांतरित करावी, पाकिस्तानने अशी मागणी विंडीज क्रिकेटला केली. तसेच वेळापत्रकात बदल न केल्यास दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागेल, अशी धमकी दिली.
दुसऱ्या बाजूला आमचं बोलणं सुरु आहे. वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असं विंडीज क्रिकेट बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं. “वेळापत्रक आहे तसंच राहिल. या प्रकरणात आमचं पीसीबीसोत बोलणं सुरु आहे”, असं विंडीज क्रिकेट बोर्डाचे सीईओ क्रिस डेहरिंग म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात काय तोडगा निघतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.