भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये बुधवारी जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच काल पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले, यावेळी हाणामारी देखील झाली. यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलले.
“काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. काल अध्यक्ष महोदयांजवळ जाऊन दिलगिरी व्यक्त केली होती. माननीय अध्यक्षसाहेबांना विनंती केली की, माझ्या सहकाऱ्यांजवळून चूक झालेली आहे. त्यांना सक्त ताकीत देऊन. काय कारवाई असेल ती कारवाई करा. तो त्यांच्या अधिकारातला विषय आहे” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
माझं त्यावर कुठलही मत नाही
“रात्री उशिरा एफआयआर दाखल झालेला आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती सर्वोच्च आहेत. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली, त्यावर माझं कुठलही मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे, त्याला कोर्टात सामोरे जाऊ” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
‘सगळे व्हिडिओ काढा’
जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला नितीन देशमुखांकडे हात दाखवताय त्यावर गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलं. “तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. एवढी सगळी गर्दी आहे. आम्ही तिथे कोपऱ्यात होतो. सगळे व्हिडिओ काढा. मी दहा-पंधरा मिनिटे तिथे होतो. आमचे कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत फोटो काढत होतो” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
‘अख्खा दिवस सभागृहात होतो’
“काल माझी लक्षवेधी होती. अख्खा दिवस सभागृहात होतो. परंतु कामकाजात नऊ लक्षवेधी झाल्या. दहावी माझी लक्षवेधी होती. म्हणाले उद्या होईल. सकाळी 9 वाजता सभागृहात आलोय. तुम्ही सगळं फुटेज काढून बघा. आमचे मंत्रिमहोदय तिथे नव्हते. अर्ध्या तासाची चर्चा लक्षवेधी होणार नाही म्हणून मी निघालो होतो. ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचा आदर करत न्यायालयात बाजू मांडू” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.