कॅनडातील व्हँकूवरमध्ये एका विमानाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. 39 वर्षीय शाहीर कासिम नावाच्या व्यक्तीने विमान अपहरण केले होते. याची माहिती मिळताच उत्तर अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) ने F-15 लढाऊ विमानाने अपहरण झालेल्या विमानाचा पाठलाग केला. त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान अपहरण करणारा व्यक्ती दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विमानाचे अपहरण कसे केले?
शाहीर कासिम हा कॅनडाचा रहिवासी आहे. तो माजी पायलट आहे. त्याने व्हँकूवर आयलंडवरील विमानतळावर एक लहान विमानाचे अपहरण केले होते. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, ‘मंगळवारी कासिमने विमान अपहरण केले होते. त्याने व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाइट इन्स्ट्रक्टरला धमकी देऊन सेस्ना विमान ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने या विमानातून 64 किलोमीटर प्रवास केला आणि तो व्हँकूवरला पोहोचला.’ आरोपीने हेतुपूर्वक हे काम केल्याचे समोर आले आहे.
अल्लाहचा दूत
आरोपी शाहीर कासिमने स्वतःला अल्लाहचा दूत म्हटले आहे. त्याने असाही दावा केला आहे की, अल्लाहने त्याला हवामान बदलापासून मानवतेला वाचवण्यासाठी पाठवले आहे. तो म्हणाला की, ‘देवदूत जिब्राईल मला दिसला होता आणि त्याने अल्लाहने दिलेला संदेश माझ्यापर्यंत पोहोचवला.’ तसेच कासिमने सोशल मीडियावरील पोस्ट करत, अचानक आणि वेगाने वाढणाऱ्या जागतिक तापमानवाढीमुळे मानव नामशेष होण्याचा इशारा दिला होता.
कासिम एअरलाइनमध्ये काम करत होता
आरोपी कासिमच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये तो 2008 ते 2010 पर्यंत सध्या बंद असलेल्या केडी एअरलाइनमध्ये काम करत होता. या एअरलाइनचे माजी मालक डायना आणि लार्स बांके यांनी सांगितले की, ‘कासिम हा सर्वात हुशार पायलट होता. तो कोणतीही गोष्ट जलद शिकायचा, तो अत्यंत बुद्धिमान होता. मात्र त्याला कंटाळा आल्यामुळे त्याने नोकरी सोडली होती.’ त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘कासिमला वाटायचे की जगाचा अंत होणार आहे.’
कासिमने केला होता सायकल टूर
डायना बांके यांनी सांगितले की, ‘2012 कासिमने जागतिक तापमानवाढीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभर सायकल टूर केली होती. त्याची ही टूर विनाअडथळा पूर्ण झाली होती.’ दरम्यान आता आरोपी कासिमवर काय कारवाई होणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.