ENG vs IND : इंग्लंडच्या खेळाडूला धक्का देणं भोवलं, Icc कडून सिराजनंतर या क्रिकेटरवर मोठी कारवाई
GH News July 18, 2025 09:14 PM

वूमन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. भारताने या मालिकेची सुरुवात विजयाने केली. भारताने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्रतिका रावल हीच्याकडे दोन वेळा चूक झाली. त्यामुळे आयसीसीने प्रतिकावर मोठी कारवाई केली आहे. प्रतिकाकडून आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 चं उल्लंघन झालं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्यावर इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या चुकीसाठी आयसीसीने दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर आयसीसीने आता प्रतिकावर कारवाई केली आहे.

नक्की काय झालं होतं?

प्रतिका रावल हीचा 18 व्या ओव्हरमध्ये रन घेताना इंग्लंड बॉलर लॉरेन फिलर हीला धक्का लागला. त्यानंतर पुढच्याच षटकात प्रतिका बाद झाली. त्यानंतर प्रतिका मैदानाबाहेर जाताना इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन हीला धडकली. त्यामुळे प्रतिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिकाला एका सामन्याच्या मानधनापैकी 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे. तसेच प्रतिकाला 1 डेमिरेट पॉइंट देण्यात आला. प्रतिकाची गेल्या 24 महिन्यांतील ही पहिलीच चूक आहे.

प्रतिकाने तिच्याकडून झालेली चूक मान्य केली आणि माफी मागितली. त्यामुळे प्रतिकावर अधिकृतपणे कोणतीही सुनावणी करण्याची गरज पडली नाही. तसेच या सामन्यात इंग्लंड ओव्हर रेट कायम राखू शकली नाही. त्यामुळे आयसीसीने इंग्लंडला सामन्यातील मानधनापैकी 5 टक्के रक्कम दंड ठोठावला.

भारताची विजयी सलामी

वूमन्स टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 4 विकेट्सने मात केली. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 259 धावांचं आव्हान भारताने 10 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

प्रतिका रावलवर आयसीसीकडून कारवाई

दीप्ती शर्मा हीने विजयात प्रमुख भूमिका बजावली. दीप्तीने सर्वाधिक आणि नाबाद 62 धावा केल्या. जेमीमाह रॉड्रिग्स हीने 48 धावांची खेळी केली. प्रतिका रावल हीने 36 तर स्मृती मंधाना हीने 28 धावांचं योगदान दिलं होतं. तर आता उभयसंघातील दुसरा सामना हा 19 जुलैला लॉर्ड्समध्ये खेळवण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.