राज ठाकरे यांनी आज मीरा रोड परिसरातील नित्यानंद नगरमध्ये सभा घेतली. सभेआधी राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरे यांच्या या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. येथील मनसेच्या शाखेचंही राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी हिंदीवरून राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, ‘मराठी शिका, आम्हाला तुमच्याशी वावडं नाही तुमच्याशी. भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार. खरं तर काय विषय होता. पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी. म्हणे हिंदी भाषा शिकली पाहिजे. त्यावरून हे सर्व सुरू झालं.’
दुकानं नाही, शाळाही बंद करेन…
राज ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हणाले की, ‘काल आमचे मुख्यमंत्री फडणवीस, त्यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता. फडणवीस जी, तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार. तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करेन.’ अशा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता…
राज ठाकरे पुढे बोलताना म्हटले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, महाराष्ट्रासाठी मराठी सक्तीची. इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली. कोण दबाव टाकतं तुमच्यावर. केंद्राचं हे पूर्वीपासूनचं आहे. काँग्रेस असल्यापासूनचं हे सगळं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्याचा प्रचंड मोठा लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता.
मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची ही त्यांची स्वप्न आहेत…
अत्रेंचा पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये हे पहिलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं. वल्लभभाई पटेलांनी. त्यांना लोहपुरुष म्हणून मानत आलो. देशाचे गृहमंत्री. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आंदोलन झाली. तेव्हा मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारलं. अनेक वर्षापासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे. सहज होत नाही. हे चाचपडून पाहत आहे. हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतो का. मराठी माणूस पेटतोय का. तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची ही त्यांची स्वप्न आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.