राज ठाकरेंनी आज मीरा रोडमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हिंदी ही सक्तीची तिसरी भाषा करणार यावरून सरकारवर सडकून टीका केली. उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता? असा सवालही उपस्थित केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी म्हटले की, ‘विषय भाषेचा आहे. जगातील सत्य, भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली तर तुम्ही कोणीही नसता जगात. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तुमची भाषा टिकवणं महत्त्वाचं आहे. फक्त मुंबईत काही झालं, तर देशभर चालू ठेवतात हिंदी चॅनलवाले. हे कसले हिंदी चॅनेलवाले. हे खरं तर सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहेत. थोड्या वेळात बघा सुरू करतील. राज ठाकरेने उगला जहर. फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हिंदी चॅनेलवाले कुणाच्या तरी सांगण्यावरून पेटून उठतात.’
हिंदीला 200 तर मराठीला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘इथे एका मिठाईवाल्याच्या कानाखाली मारल्यावर देशाची बातमी झाली. देशात वेगळं चित्र रंगवलं जातं. हे काय राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्या. कोणती हिंदी घेऊन बसलो. त्याला फक्त 200 वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावर मोदींना मी सांगितलं माझ्या पाच गोष्टी आहे. त्यात मराठी भाषेला दर्जा द्या. दिला. पण वर्ष झालं. एक रुपया आला नाही.
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हिंदी बोलली जाते, मग नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येता?
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर कमीत कमी ती भाषा 1400 वर्ष जुनी पाहिजे. हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी 1200 वर्ष आहेत. ती भाषा आमच्यावर आणि मुलांवर लादणार. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटातील नट नट्यांचं भलं झालं. उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते,मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात का येतात. तुमच्याच भाषेने तुमचं भलं झालं नसेल तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या लागत असेल, गुजरातमध्ये जाऊन मार खावा लागत असेल तर हिंदीने तुमचं काय भलं केलं? कोणती भाषा घेऊन बसलो आपण. त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला? मला कारणच नाही कळलं. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.