कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तसेच कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटेंवर टीका करत त्यांना जंगली रमीचा ब्रँड अँबेसिडर करण्याची मागणी केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
माणिकराव कोकाटेंना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करा
जितेंद्र आव्हाड यांनी, ‘ते जुगार खेळत होते तर खेळत होते. आता छोटा व्हिडीओ बाहेर आला मोठा व्हिडिओ आला असता तर काय झालं असतं. आता अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोकटेंवर कारवाई करावी. माणिकराव कोकाटेंवर कारवाई करा आणि त्यांना जंगली रमीचा ब्रँड अम्बेसिडर करा’ अशी मागणी केली आहे. तसेच माणिकराव कोकाटे पत्ते खेळताना दिसत आहेत, त्यांचा राजीनामा घ्या असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
पडळकरांवरही टीका
काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, ‘त्यांच्याच आमदारांनी खूनवायचं आणि त्यांच्या आमदारांनी मारायचं असं सुरु आहे. तो माणूस शरद पवार शरद पवारांच्या कन्येबद्दल अश्लील भाषेत बोलतो. तो माणूस उद्धव ठाकरे यांना सूर्याजी पिसाळ ची अवलाद म्हणतो म्हणजे बाळासाहेब ठाकरे सूर्याजी पिसाळ का?. पवार साहेबांना कोणी काही बोललं तरी आम्ही अंगावर जाणारे माणसं आहोत असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आता त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं विधान तटकरेंनी केलं आहे. त्यामुळे आता कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेणार आहेत.