प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडीओ, एक बटण दाबलं की…हनी ट्रॅप प्रकरणी खडसेंच्या दाव्याने खळबळ!
GH News July 21, 2025 07:11 PM

Eknath Khadse : राज्यात सध्या हनी ट्रॅपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या हनी ट्रॅपमध्ये काही आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असे साधारण 70 पेक्षा जास्त जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशीही चालू असल्याचे बोलले जात असून काही अधिकाऱ्यांनी आपले फोन फॉरमॅट केल्याचंही बोललं जातंय. दरम्यान, एकीकडे या हनी ट्रॅपची राज्यभरात चर्चा चालू असताना आता दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅपबद्दल सगळे माहिती आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसेच या प्रकरणीच एसआयटीमार्फत चौकशी करावी, असी मागणीही त्यांनी केलीय.

महाराष्ट्रात अलिकडच्या कालखंडात बऱ्याच ठिकाणी असे हनी ट्रॅपची प्रकरणं घडत आहेत. नुकतंच नाशिकचं एक प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात 72 अधिकारी आणि काही लोक अडकल्याचे सांगितले जाते आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे, असं खडसे यांनी म्हटलंय.

प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर दोन गुन्हे

दुसरे प्रकरण हे प्रफुल्ल लोढा या जळगावमधील माणसाचे आहे. ही व्यक्ती भाजपाचा, गिरीश महाजन यांचा कार्यकर्ता आहे. या माणसाविरोधात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंधेरी, साकिनाका इथे हे वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. एक गुन्हा हा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे, या मुलींना छळणे, ब्लॅकमेलिंग करणे असा या प्रकरणात आरोप आहे. तर दुसरा गुन्हा हा हनिट्रॅपसंदर्भात आहेत. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना आमिष दाखवणे, त्यांचे अश्लील फोटो काढणे असे गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहिती खडसे यांनी दिलीय.

प्रफुल्ल लोढाचा राजकीय इतिहास काय?

हा प्रफुल्ल लोढा हनिट्रॅप प्रकरणात आहे, बलात्कार प्रकरणातही आहे. हा एक सामान्य कार्यकर्ता होता. अगोदर तो काँग्रेसमध्ये होता. नंतर तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. नंतर त्याने भाजपा प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या पक्षप्रवेशाला मुख्यमंत्री कार्यालयाचे रामेश्वर नाईकसुद्धा उपस्थित होते, असेही खडसे यांनी सांगितले आहे.

चांगले संबंध कसे खराब झाले?

तसेच, या प्रफुल्ल लोढा,गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांचे खूप चांगले संबंध होते.पण गेल्या वर्षी याच प्रफुल्ल लोढा याने रामेश्वर नाईक आणि गिरीश महाजन विरोधात एक तक्रार दाखल केली होती. मग यांच्यातील चांगले संबंध कसे खराब झाले, असा सवाल उपस्थित होतो, असंही खडसे यांनी म्हटलंय.

एक बटण दाबलं की संपूर्ण देशात…

पुढे बोलताना याच प्रफुल्ल लोढा याने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने अनेक तथ्यं मांडली आहेत. एक बटण दाबलं की संपूर्ण देशात हाहा:कार माजेल. पण मी कुणालातरी आई बोललो आहे आणि वहिनी बोललो आहे, असं त्याने या व्हिडिओ मध्ये सांगितले असल्याचाही दावा खडसे यांनी केलाय.

या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा

या प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडिओ आहेत. स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी पारदर्शक पद्धतीने होऊ करत नाही. त्यामुळे त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही खडसे यांनी केली आहे.

फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या

दरम्यान, याच प्रफुल्ल लोढाचा एक फोटो ट्वीट करून संजय राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही, असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या. त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं थेट आव्हानच राऊत यांनी या ट्वीटच्या माध्यमातून दिलं आहे. तसेच 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

त्यामुळे आता संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यासोबतचा प्रफुल्ल लोढा याचा ट्वीट केलेला फोटो आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी केलेले गंभीर आरोप यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. हनी ट्रॅपचे हे कथित प्रकरण काय आहे? असा सवाल सगळीकडे उपस्थित केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.