‘मी तुझ्याशी…’ श्रीसंतच्या मुलीचं म्हणणं ऐकून हरभजन सिंहच्या डोळ्यात अश्रू
GH News July 21, 2025 10:10 PM

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यात घडलेलं प्रकरण काही केल्या विस्मरणात जात नाही. हरभजन सिंगने रागाच्या भरात एस श्रीसंतच्या कानशि‍लात लागवली होती. हरभजन सिंग हे प्रकरण विसरण्याचा प्रयत्न करतो मात्र तसं होत नाही. इतकंच काय तर हरभजन सिंगने या प्रकरणात स्वत:ची चूक असल्याची कबुली देखील दिली आहे. नुकतंच श्रीसंतच्या मुलीसोबत झालेल्या चर्चेबाबत मोठा खुलासा हरभजन सिंगने केला. श्रीसंतच्या मुलीचं म्हणणं ऐकून हरभजन सिंगच्या डोळ्याच पाणी आलं होतं. रविचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनेलवर कुट्टी स्टोरीज या कार्यक्रमात हरभजन सिंगला एक प्रश्न विचारण्यात आला. तुझ्या आयुष्यातील कोणती घटना खोडून टाकशील? तेव्हा हरभजनने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. तसेच काय झालं ते सांगितलं.

‘मी एक गोष्ट माझ्या आयुष्यातून बदलू इच्छितो. ती घटना श्रीसंतशी निगडीत आहे. मी ती घटना माझ्या करिअरमधून कायमची हटवू इच्छितो. हीच ती घटना आहे जी मी माझ्या आयुष्यात दूर करेन. जे काही घडलं ते चुकीचं होतं आणि मला तसं वागायला नको होतं. मी 200 वेळा माफी मागितली. मला इतक्या वर्षानंतरही या गोष्टीचं वाईट वाटतं. मी प्रत्येकवेळी जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा माफी मागतो. ती एक चूक होती.’, असं हरभजन सिंग याने सांगितलं. आयपीएल 2008 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना हरभजन सिंगने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा खेळाडू श्रीसंतच्या कानशि‍लात लगावली होती. त्यानंतर बीसीसीआयने हरभजन सिंगला निलंबित केलं होतं.

‘मी श्रीसंतच्या मुलीला भेटलो होतो आणि तिच्याशी प्रेमाने गप्पा मारत होतो. तेव्हा तिने सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं नाही. तू माझ्या वडिलांना मारलं आहे. हे ऐकून माझं हृदय पिळवटून निघालं. मला रडायला आलं. मी स्वत:ला विचारत होतो की मी तिच्यावर काय प्रभाव टाकला आहे? तिच्या मनात माझ्याबाबत वाईट असेल, हो ना? ती मला त्याच रुपात पाहते की ज्याने तिच्या वडिलांना मारलं. मी आजही त्याच्या मुलीची माफी मागतो आणि याशिवाय काय करू शकत नाही. कदाचित मोठी झाल्यानंतरही तिच्या मनात तसं काही नसेल. पण तिचा काका तिच्यासोबत कायम असेल आणि सर्वोतोपरी मदत करेल. यासाठी हे प्रकरण मला कायमचं खोडून काढायचं आहे.’, असं हरभजन सिंग याने सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.