भारतीय क्रिकेट संघासमोर मँचेस्टरमध्ये होणऱ्या चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी साधण्याचं आव्हान आहे. भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे या आव्हानात आणखी भर पडली आहे. वेगवान गोलंदाज दुखापतीने ग्रासलं आहे. तर युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. मात्र या दरम्यान भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा उपकर्णधार विकेटकीपर ऋषभ पंत चौथ्या कसोटीत खेळण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे पंत विकेटकीपिंग आणि बॅटिंग या दोन्ही भूमिका पार पाडू शकतो.
ऋषभ पंत याला इंग्लंड विरूद्ध लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी दुखापत झाली होती. पंतला या दुखापतीमुळे पुन्हा विकेटकीपिंग करता आली नाही. पंतऐवजी त्या सामन्यात ध्रुव जुरेल याने विकेटकीपिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पंत विकेटकीपिंग करु शकला नाही. मात्र त्याने दोन्ही डावात फलंदाजी केली. पंतने पहिल्या डावात अर्धशतक केलं. मात्र पंतला दुसऱ्या डावात दुखापतीमुळे फार वेळ मैदानात घालवता आला नाही.
पंत या दुखापतीमुळे मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत सहभागी होऊ शकणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. तसेच पंत फक्त फलंदाज म्हणून या सामन्यात खेळू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या सामन्याच्या काही तासांआधी भारतीय संघासह चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पंतने चौथ्या सामन्याआधी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात विकेटकीपिंगचा सराव केला. पंत आणि टीम इंडियाच्या सरावाचा व्हीडिओ सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता पंत चौथ्या कसोटीत खेळू शकतो, अशी आशा चाहत्यांना आहे.
ऋषभ पंतकडून विकेटकीपिंगचा सराव!
पंतची दुखापतीनंतर ग्लोव्हज घालून विकेटकीपिंगचा सराव करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रिपोर्ट्सनुसार, पंतच्या दुखापत झालेल्या तर्जणीवर पट्टी लावलेलीच आहे. पंत मँचेस्टरमध्ये खेळणार असेल तर हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांसाठी हा सर्वात मोठा दिलासा असेल. त्यामुळे आता पंतबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.