बांग्लादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी एअरफोर्सच एक विमान कोसळलं. FT-7BGI प्रकारच हे फायटर जेट होतं. हे चिनी बनावटीच फायटर विमान होतं. हे विमान ढाक्याच्या माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा परिसरात कोसळलं. दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यात बहुतांश शाळकरी मुलं आहेत. 150 जखमी झाले आहेत. मागच्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काहीमिनिटात कोसळलं होतं. बांग्लादेशात घडलेला अपघात सुद्धा तशाच प्रकारचा होता. एअर इंडियाच्या विमान अपघातात 270 लोकांचा मृत्यू झाला होता.
बांग्लादेशने आपली हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी चीनकडून FT-7BGI विमान विकत घेतलं होतं. हे चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन चीनद्वारा निर्मित विमानं आहे. जे विमान कोसळलं, ते F-7 विमानाचं अत्याधुनिक वर्जन आहे. बांग्लादेशने 2022 साली चीनकडून 36 FT-7BGI विमानं विकत घेतली. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा उपयोग केला जातो.
चिनी शस्त्रांमुळे फटका बसला
संपूर्ण जगात चिनी बनावटीच्या शस्त्राची अब्रू जाण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. याआधी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानला चिनी शस्त्रांमुळे फटका बसला होता. लाहोरमध्ये चिनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टिम भारताने उडवून दिली होती. पंजाबच्या चुनिया एअरबेसवरील चिनी बनावटीच YLC-8E अँटी-स्टेल्थ रडार पूर्णपणे उद्धवस्त झालं होतं.
गंभीर संकटकाळात फार उपयोग नाही
चीनकडून मिळालेले ड्रोन्स आणि AR-1 लेजर गाइडेड मिसाइल पाकिस्तानने भारतावर डागले. पण भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने ही मिसाइल्स हवेतच नष्ट केली. ऑपरेशन सिंदूरमुळे सिद्ध झालं की, पाकिस्तानकडे असलेली चिनी बनावटीची शस्त्रास्त्र आणि फायटर विमानं गंभीर संकटकाळात फार उपयोगाची नाहीत.
एक ट्रेनी विमान होतं
बांगलादेशी माध्यमांनुसार, FT-7BGI हे बांग्लादेशी एअरफोर्सचे एक ट्रेनी विमान आहे. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या मते, लढाऊ विमानाने दुपारी 1:06 वाजता उड्डाण केले आणि दुपारी 1:30 वाजता ते कोसळलं. हजरत शाहजहां आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अपघाताची पुष्टी केली आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला.