Energy Drinks Side Effects: सतत एनर्जी ड्रिंक घेता? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
Marathi July 22, 2025 07:25 PM

आजकाल आपण नकळत एनर्जी ड्रिंक मोठ्या प्रमाणात घेतो. थकवा आलेला असेल किंवा काही थंड पिण्याची इच्छा झाली की एनर्जी ड्रिंकचा पर्याय आपल्याला दिसतो. हे एनर्जी ड्रिंक आता तरुणांच्या जीवनशैलीचा महत्वपूर्ण भाग बनले आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का हे एनर्जी ड्रिंक आपल्या आरोग्यासाठी चांगले असते का वाईट? याबद्दलच आपण आज जाणून घेऊया…

एनर्जी ड्रिंकमध्ये काय असते?

एनर्जी ड्रिंक्स हे थकवा आल्यानंतर एनर्जीसाठी घेतले जाते. कधी कधी थंड पिण्याची इच्छा झाल्यास देखील एनर्जी ड्रिंक्स तरुण घेत असतात. यामध्ये कॅफिन, साखर, टॉरिन, बी-जीवनसत्त्वे आणि काही इतर उत्तेजक घटक असतात. या घटकांमुळे त्वरित ऊर्जा मिळते असा दावा केला जातो. मात्र असे असले तरी हे घटक आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. त्याचे परिणाम कालांतराने दिसून येत असतात.

एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या कॅफिनमुळे काही वेळासाठी उत्साही वाटू शकते. तसेच थकवा जाणवत असल्यास हे घेतल्याने झोपही कमी येते. ज्यामुळे तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकता. मात्र याचे काही गंभीर परिणाम तुम्हाला जाणवू शकतात. एनर्जी ड्रिंक्समधील घटकांमुळे तुम्हाला रक्तदाब, हृदयविकाराच्या समस्या होऊ शकतात.

रक्तदाब, हृदयविकार

एनर्जी ड्रिंकमध्ये चहा किंवा कॉफीपेक्षा जास्त कॅफिन असते. वारंवार सेवन केल्याने कमी झोप, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मधुमेह

या पेयांमध्ये अनेकदा साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते आणि मधुमेहाचा धोका देखील निर्माण होतो.

यकृत आणि मूत्रपिंडांवर परिणाम

सतत एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्याने यकृत आणि मूत्रपिंडांवर दबाव येऊ शकतो.

सवय लागणे

एनर्जी ड्रिंक्सची सवय लागू शकते. शिवाय त्याचे सेवन केल्याशिवाय कोणतेही काम करणे कठीण जाऊ शकते. दररोज ते घेतल्यास पुढे आरोग्य समस्या निर्माण होतात.

उपाय

तरुणांनी एनर्जी ड्रिंक्स घेताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. थंड पिण्याची इच्छा झाल्यास पाणी, नारळपाणी, लिंबू मध पाणी, मिल्कशेक हे उत्तम पर्याय आहेत. हे पौष्टिक देखील असते तसेच पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.