Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कोकाटे यांनी मात्र मी रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो, असं कोकाटे यांनी सांगितलंय. दरम्यान, महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले उदय सामंत यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकात खासदार शरद पवार यांनी फडणवीसांचे तोंडभरून कौतुक केले आहे. यावर उदय सामंत यांनी खोचक उत्तर दिलंय. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. ते जर फडणीस यांची स्तूती करत असतील तर ही चांगली बाब आहे. पण ही स्तूती मिश्कील आहे का? याचं ऊत्तर तेच देऊ शकतील, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिलीय. तसेच फडणवीस यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही कौतुक केले आहे. त्यावर बोलताना ज्यांनी एकतर मी संपेन किंवा फडणवीस यांना संपवेन अशी भाषा केली त्या ठाकरेंना उशिराने शहाणपण सुचलंय. आता त्यांच्याकडे शुभेच्छा देण्याखेरा पर्याय शिल्लक राहिला नाहीये. त्यांना त्यांची चूक कळाली असावी, असा टोला सामंत यांनी लगावलाय.
तसेच त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलंय. माणिकराव कोकाटेंच्या विधानाचं समर्थन करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की मंत्र्यांनी अशी विधानं टाळायला हवीत, असे मत सामंत यांनी व्यक्त केले. तसेच राजीनाम्याच्या विरोधकांच्या मागणीवर अजित पवार योग्य तो निर्णय घेतील, अशी माहितीही सामंतांनी दिली. माणिकराव कोकाटेंनी वादविवाद होणारी विधाने टाळायला हवीत, असं सामंत म्हणाले.
दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्यावर एक विधान केलं होतं. कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे तटकरे म्हटले होते. तटकरे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पण कोकाटे यांनी मी राजीनामा देणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.