ENG vs IND : भारताचा आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर, अशाने कसा जिंकणार सामना?
GH News July 22, 2025 10:13 PM

दुखापतीने ग्रासलेल्या आणि इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील आणखी एका खेळाडूची दुखापतीने विकेट काढली आहे. अर्थात या खेळाडूला दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 23 जुलैपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेला संबोधित केलं. शुबमनने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याला दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. याबाबतची अधिकृत माहिती शुबमनने पत्रकार परिषेदत दिली. आकाश बाहेर झाल्याने भारताला मोठा झटका लागला आहे. आकाश दुखापतीमुळे बाहेर होणारा भारताचा एकूण तिसरा खेळाडू ठरला आहे.

आकाशआधी युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतूनच बाहेर व्हावं लागलं. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह चौथ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अर्शदीपला याआधीच्या तिन्ही सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र अर्शदीपला चौथ्या सामन्यात संधी दिली जाणार, अशी चर्चा होती. मात्र त्याआधीच दुखापतीमुळे अर्शदीपचा पत्ता कट झाला.

आकाशची मॅचविनिंग कामगिरी

आकाश दीप याला इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. आकाशने या संधीचा फायदा घेत धमाका केला होता. आकाशने या सामन्यात एकूण 10 विकेट्स घेत भारताच्या ऐतिहासिक विजयात प्रमुख भूमिका बजावली होती. भारताने हा सामना तब्बल 336 धावांच्या फरकाने जिंकला होता.

तिसऱ्या सामन्यातून जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झालं. त्यामुळे आकाशला बाहेर व्हावं लागणार असल्याचं स्पष्ट होतं. मात्र आकाशला दुसऱ्या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवण्यात आलं. आकाशसाठी प्रसिध कृष्णाला बाहेर करण्यात आलं. आकाशने तिसऱ्या सामन्यातही बॉलिंगने धारदार कामगिरी केली. मात्र या दरम्यान त्याला दुखापत झाली. आकाशला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं होतं. तेव्हापासून आकाश चौथ्या सामन्यात खेळू शकणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. मात्र अखेर आकाश दुखापतीमुळे बाहेर झाल्याचं शुबमनने जाहीर केलं.

दरम्यान आकाश अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा एकूण आणि भारताचा तिसरा गोलंदाज आहे.आकाशने 2 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. तर यादीत मोहम्मद सिराज 13 विकेट्ससह पहिल्या स्थानी विराजमान आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.