Ajit Pawar: बीडच्या पालकमंत्रिपदानंतर कृषीमंत्रीपदही अजित दादांकडे? ‘या’ नेत्याने केली मागणी
GH News July 23, 2025 06:13 PM

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत सापडले आहेत. विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कोकाटे यांनी मंत्रि‍पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी अजित पवारांना हे खात सांभाळण्याची विनंती केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोकाटे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात

माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, माणिकराव कोकोट गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने करत आहेत. ते पत्ते खेळत होते, पत्ते घरी खेळा. विधिमंडळात तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा तुम्ही खेळ खेळता हे चुकीचे आहे.

अजितदादा तुम्ही कृषी खात्याची जबाबदारी घ्या

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, कोकाटे पत्रकार परिषदेत अहंकाराने बोलले. ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणाले, ते सरकारलाही भिकारी म्हणाले, तुमच्या कृत्यामुळे तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल. तुमचे नेते याबाबत काय निर्णय घेतात ते पहावं लागेल. अजित दादांना माझी विनंती आहे, कोकाटेंचं खातं बदला आणि तिथे चांगल्या व्यक्तीला संधी द्या. नाहीतर तुम्हीच तिथे कृषी खात्याची जबाबदारी सांभाळा.

पुढे बोलताना रोहित पवार यांनी, ‘आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काहीही समजतात, दादा तर एका पक्षाचे प्रमुख झाले आहेत. तुमचे मंत्री अशा पद्धतीने वागत असतील तर, दादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण त्यांच्या मंत्र्यांवर कंट्रोल नाही असं म्हणायचं का? असा प्रश्नही अजित पवारांना विचारला आहे.

राजीनामा देण्यासारखं काय घडलं?

विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना कोकाटे यांनी, ‘राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय. ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात’ असं विधान केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.