भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या मैदानात भारताला कधीच यश मिळालेलं नाही. अशा स्थितीत भारताला नाणेफेकीनेही पाठ दाखवली आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाज करावी लागणार आहे. तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. तीन कसोटी सामन्यातील सहा डावात फेल गेलेल्या करुण नायरला बसवण्यात आलं आहे. तर पहिल्या कसोटीनंतर आराम दिलेल्या शार्दुल ठाकुरचा संघाच समावेश झाला आहे. तर आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी हे दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्या जागी संघात अंशुल कंबोजला स्थान देण्यात आलं आहे. हरियाणाचा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज कंबोज या मालिकेपूर्वी इंडिया अ संघाचा भाग म्हणून इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनऑफिशियल कसोटी सामने खेळला होता. मँचेस्टरमध्ये 25 वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने पदार्पण केलं आहे.1990 मध्ये अनिल कुंबळे हा मँचेस्टरमध्ये कसोटी पदार्पण करणारा शेवटचा भारतीय होता. योगायोगाने अनिल कुंबळे आणि अंशुल कंबोज दोघांनीही प्रथम दर्जा क्रिकेटमध्ये 10 बळी घेतले आहेत.
शुबमन गिलने सलग चौथ्यांदा नाणेफेकीचा कौल गमावला. यानंतर त्याने सांगितलं की, ‘मी खरंच गोंधळलो होतो. नाणेफेक हरणे चांगले ठरले.’ गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आपण ज्या पद्धतीने खेळलो ते उत्कृष्ट होते. काही कठीण क्षण आम्ही गमावले आहेत. परंतु आम्ही त्यापेक्षा जास्त सत्रे जिंकली आहेत. थोडा ब्रेक हवा होता. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तीव्रता होती. चांगली कामगिरी दिसते. चार-पाच दिवसांत काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत, असंही त्याने पुढे सांगितलं. तसेच संघात तीन बदल केल्याचं त्याने स्पष्ट केलं. करुणच्या जागी साई सुदर्शन, आकाश दीप आणि रेड्डी जखमी असल्याने त्यांच्या जागी कंबोज आणि शार्दुलचाही समावेश केला आहे.
करुण नायर मागच्या तिन्ही कसोटी सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर करणार याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली होती. त्यामुळे त्याच्या क्रिकेट करिअरला ब्रेक लागला अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र चौथ्या कसोटीत एखाद्या खेळाडूने निराशाजनक कामगिरी केली किंवा जखमी झाला तर पाचव्या कसोटीत संधी मिळू शकते. मात्र हा शेवटी नशिबाचा भाग असणार आहे. दुसरीकडे, कुलदीप यादवला चौथ्या कसोटीतही संधी मिळाली नाही.