निशिकांत दुबे: गेल्या दिवसांआधी महाराष्ट्रात हिंदी भाषेचा मुद्दा तापला होता. यादरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान देत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राला डिवचलं होतं. निशिकांत दुबेंच्या या विधानावरुन महाराष्ट्रात चांगलंच वातावरण तापलं. यानंतर आता महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत निशिकांत दुबेंना घेरल्याचं समोर आलं आहे.
लोकसभेचं हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सध्या सुरु आहे. यातच काल लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव हे निशिकांत दुबे यांना शोधत होत्या. त्यानंतर निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेरलं. यावेळी मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाहीय, असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं. यानंतर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है, असं म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले. यावेळी महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील खासदार देखील आजूबाजूला उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
हिंदीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमधील एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलणार नाही, असं म्हटल्याने हात उचलला. यावरुन निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला होता. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे. तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे.
निशिकांत दुबेंच्या विधानाचा राज ठाकरेंनी मीरा-रोडमधील सभेत खरपूस समाचार घेतला. दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु…त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो…दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा