ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसला नाशिकमध्ये मोठं खिंडार? बागुल, राजवाडेंसोबत बडे नेते कमळ हाती घेण्याची
Marathi July 24, 2025 12:25 PM

नाशिक राजकारण: ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या रविवारी नाशिकमध्ये या दोघांसह काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करत सुनील बागूल आणि मामा राजवाडे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे (Congress) नाशिकमध्ये बडे नेते भाजपने गळाला लावल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये भाजपने ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडल्यानंतर काँग्रेसचे देखील नाशिकमधील बडे नेते भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपकडून नाशिक महापालिकेत शंभर पारचा नारा पूर्ण करण्यासाठी भाजप इतर पक्षातील नेत्यांना गेल्या काही दिवसांपासून गळाला लावत आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार?

ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे नेते महायुतीमध्ये सामील झाल्याने नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. तर आता काँग्रेसमधील बडे नेते भाजपकडून पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. येत्या रविवारी सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा नाशिकमध्ये भाजप प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.

काँग्रेस शहराध्यक्षांचा भाजपवर पलटवार

दरम्यान, एकीकडे या चर्चांना उधाण आलेले असतानाच या अफवा असल्याचे सांगत नाशिक शहर काँग्रेसकडून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, नाशिकमधील काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवली जात आहे. मी जबाबदारीने सांगतो की, ज्या ज्या लोकांची नावे घेतली जातात, ज्या लोकांबद्दल अफवा पसरवली जाते ते गेली 50 ते 60 वर्ष काँग्रेसच्या विचाराशी जोडलेले आहेत. नाशिक शहरातील काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता भारतीय जनता पक्षात जाणार नाही. अफवा पसरवण्याचं काम, दमदाटी, दडपशाही, ब्लॅकमेलिंग करून आपल्या पक्षात घ्यायचे हे धोरण आता लोकांच्या देखील लक्षात आलेले आहे. त्यामुळे आता यापुढे ते यशस्वी होऊ शकत नाही, असा पलटवार त्यांनी भाजपवर केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Ambadas Danve: महाराष्ट्रात रमीला राजमान्यता द्या, तातडीने अध्यादेश काढा! पॉप-अप आल्यावर डोकं कशाला खाजवायला लागतं? अंबादास दानवे कृषीमंत्र्यांवर तुटून पडले

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.