तामिळनाडूतील सदस्य : द्रमुकच्या पी. विल्सन यांची फेरनिवड
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राज्यसभेने गुरुवारी कार्यकाळ संपत आलेल्या तामिळनाडूतील सहा सदस्यांना निरोप दिला. सभागृहात विविध पक्षांच्या खासदारांनी देशातील लोकशाही परंपरा मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. एम. मोहम्मद अब्दुल्ला (द्रमुक), एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके), अंबुमणी रामदोस (पीएमके), एम. षण्मुगम (द्रमुक), वायको (एमडीएमके) आणि पी. विल्सन (द्रमुक) यांचा कार्यकाळ गुरुवारी संपला. निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी द्रमुकचे पी. विल्सन हे राज्यसभेवर पुन्हा निवडून आले आहेत. ते आज शुक्रवारी दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा शपथ घेतील.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, सभागृह नेते जे. पी. नड्डा आणि विविध राजकीय पक्षांच्या अनेक ज्येष्ठ खासदारांनी सार्वजनिक संवाद आणि लोकशाही परंपरा मजबूत करण्यात निवृत्त सदस्यांच्या योगदानाचे कौतुक केले. राज्यसभेतील सहा निवृत्त सदस्यांना निरोप दिल्यानंतर विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधील मतदारयादी सुधारणेवरून गुरुवारी सलग चौथ्या दिवशीही राज्यसभेत विरोधी सदस्यांचा गोंधळ सुरू राहिला. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप दिला. यादरम्यान, एमडीएमके नेते वायको यांनी राज्यसभेतील त्यांच्या निरोप भाषणात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी सभागृहाचे माजी सभापती जगदीप धनखड यांचेही आभार मानले.
उपसभापती हरिवंश यांनीही निवृत्त होणाऱ्या सदस्यांप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या कार्याची माहिती कथन केली. या ज्येष्ठ सदस्यांनी सभागृहाच्या चर्चेत भाग घेत देशविकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्याकडील विविध अनुभव, दृष्टिकोन, सार्वजनिक सेवा आणि लोकशाही मूल्यांचा लाभ सभागृहाला झाल्याचे हरिवंश सिंह यांनी नमूद केले. तसेच त्यांना भविष्यात चांगले आरोग्य, आनंद आणि यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री आणि सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. निवृत्त सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळात धोरणात्मक, कायदेशीर आणि सामाजिक म्द्दु्यांसह विविध पैलूंवर मौल्यवान अंतर्दृष्टी दिल्यामुळे सभागृह समृद्ध झाले, असे नड्डा म्हणाले.