थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील संघर्ष सुरू आहे.
Marathi July 26, 2025 09:25 AM

थायंलडने सीमावर्ती भागातून 1 लाख लोकांना हटविले : आतापर्यंत 16 ठार

स्क्रिन्ट इन्स्टिट्यूट/ बांगोंक/ नोम पेन

थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेला संघर्ष दुसऱ्या दिवशीच जारी राहिला. शुक्रवारी सकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी सीमेवर गोळीबार केला. 1 लाखाहून अधिक लोकांना घर सोडावे लागल्याची माहिती थायलंडच्या सरकारने दिली आहे. या संघर्षात आतापर्यंत थायलंडमधील 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 1 सैनिक आणि 15 नागरिकांचा समावेश आहे. तर या संघर्षात 46 जण जखमी झाले आहेत. तर कंबोडियाकडून जीवितहानीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

दोन्ही देशांमधील वादाचे कारण 900 वर्षे जुने शिव मंदिर (प्रासात ता मुएन थोम) ठरले आहे. कंबोडियाच्या सैन्याने मंदिर परिसरात ड्रोन्सचे उ•ाण केल्यावर हा संघर्ष सुरू झाला होता. चर्चेद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, परंतु यात यश न आल्याने शुक्रवारीही गोळीबार झाल्याचे थायलंडकडून सांगण्यात आले.

थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमावादाचा इतिहास 118 वर्षे जुना आहे. जो प्रीह विहियर मंदिर आणि आसपासच्या क्षेत्रांवरून आहे. कंबोडिया फ्रान्सच्या अधीन असताना 1907 साली दोन्ही देशांदरम्यान 817 किलोमीटर लांब सीमारेषा निश्चित करण्यात आली

होती. थायलंडने या सीमारेषेला नेहमीच विरोध दर्शविला आहे, कारण नकाशात प्रीह विहियर नावाचे ऐतिहासिक मंदिर कंबोडियाच्या हिस्स्यात दाखविण्यात आले आहे. 1959 मध्ये कंबोडियाने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडला होता, 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंदिर कंबोडियाचे असल्याचा निर्णय दिला होता. थायलंडने हा निर्णय मान्य केला, परंतु मंदिराच्या आसपासच्या जमिनीवरून वाद जारी ठेवला.

वारसास्थळात सामील करविण्यावरून संघर्ष

कंबोडियाने 2008 साली या मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करविण्याचा प्रयत्न केला, मंदिराला मान्यता मिळाल्यावर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये पुन्हा संघर्ष झाला. 2011 मध्ये स्थिती बिघडल्याने हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले होते. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दोन्ही देशांना वादग्रस्त क्षेत्रातून सैनिक हटविण्याचा आदेश दिला होता. तर 2013 साली न्यायालयाने मंदिर आणि आसपासचे क्षेत्र कंबोडियाचे असल्याची पुष्टी दिली. तरीही सीमेच्या मुद्द्यावरून वाद अद्याप कायम आहे. या वादानंतरही थायलंड आणि कंबोडियाला जगातील सर्वात चांगल्या शेजारी देशांपैकी एक मानले जात होते. काही वर्षांपूर्वी पर्यंत दोन्ही देशांच्या नेत्यांची ही मैत्री तुटणार नसल्याचे मानणे होते. परंतु कालौघात स्थिती बदलली आणि तणाव वाढला आहे. 28 मे रोजी एमराल्ड ट्रायंगलवर दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान झटापट झाली, ज्यात एक कंबोडियन सैनिक मारला गेला. या ठिकाणी थायलंड, कंबोडिया आणि लाओसच्या सीमा परस्परांना मिळतात. थायलंड आणि कंबोडिया दोन्ही देश या भूभागावर दावा करतात.

परस्परांवर बंदी

सैनिकाच्या मृत्यूमुळे नाराज होत कंबोडियाचे नेते हुन सेन यांनी सीमेवर आणखी सैनिक अन् शस्त्रास्त्रs पाठविण्याचा आदेश दिला होता. तर थायलंडने कंबोडियाचा वीजपुरवठा अन् इंटरनेट सेवा रोखण्याची धमकी दिली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल कंबोडियाने थाई टीव्ही आणि चित्रपटांवर तसेच थाई उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे. थायलंडने कंबोडियात जाणाऱ्या स्वत:च्या कामगारांना सीमा ओलांडण्यास मनाई केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.