राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अनुदानातून 832 EMRS विद्यार्थ्यांना 62.40 लाखांच्या निधीचे वितरण
Tv9 Marathi July 26, 2025 03:45 AM

आदिवासी कार्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील येणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण संस्थेच्यामार्फत, राष्ट्रपतींच्या विवेकाधीन अनुदानातून 62.40 लाखांच्या निधीचे आज वितरण करण्यात आले आहे. ही आर्थिक मदत देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील (EMRS) बारावीतील 832 गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपतींच्या संमतीने ही विशेष मदत मंजूर करण्यात आली होती, ती आता वितरितही कण्यात आली आहे.

या आर्थिक मदतीसाठी EMRS शाळेतील बारावीच्या विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 7500 रुपये इतकी रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर करण्यात आली होता. अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यातून या अनुदान वितरणातील पारदर्शकतेची खात्री मिळते.

10 ईएमआरएस शाळांमधील 20 विद्यार्थ्यांचे गुण समान होते, त्यामुळे टाय-ब्रेकर निकष लागू करण्यात आले होते. अशा ठिकाणी मुलींना प्राधान्य देण्यात आले आहे, मात्र अशा तरीही गुण टाय झाले होते, त्यामुळे इयत्ता अकरावीतील गुण विचारात घेण्यात आले आणि त्यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

आदिवारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि NESTS यांची दूरदृष्टी अधोरेखित करतो. या उपक्रमाचा उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आदिवासी तरुणांना उच्च शिक्षण व व्यावसायिक संधी मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे. या उपक्रमाद्वारे गुणवत्तेचा सन्मान करण्यात आला आहे, यामुळे शैक्षणिक असमतोल दूर होईल आणि आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.