जर तुम्ही कधी भगवान शिवाची नटराज मुद्रा असलेली मूर्ती पाहिली असेल, तर त्यात त्यांच्या उजव्या पायाखाली एक बुटका राक्षस दबलेला दिसतो. अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की तो बुटका राक्षस कोण आहे? आणि तो का दबवून ठेवला आहे? यामागे एक अत्यंत गूढ आणि रंजक गोष्ट आहे, जी आज आपण सोप्या आणि स्पष्ट भाषेत जाणून घेणार आहोत.
हा बुटका राक्षस आहे अप्समार, जो अज्ञान, अहंकार आणि भ्रमाचं प्रतीक मानला जातो. तो असा राक्षस होता, ज्याचं अस्तित्व आत्मज्ञान आणि विवेकाला धक्का देणारे होतं. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की त्याला ना देव, ना माणूस, ना दुसरा राक्षस ठार करू शकेल. हा वर मिळताच तो अहंकाराने फुगला आणि देवता, ऋषी आणि साधक यांना त्रास द्यायला लागला. त्याचा प्रभाव इतका प्रचंड होता की, तो लोकांची बुद्धी आणि विवेकच गिळून टाकायचा. त्यामुळे लोक अज्ञान, मोह आणि पापाच्या दलदलीत अडकायचे.
या संकटामुळे देवतेनी प्रथम विष्णुंच्या, आणि मग भगवान शिवाकडे धाव घेतली. पण ब्रह्मदेवाच्या वरामुळे त्याला ठार मारणं शक्य नव्हतं. म्हणून शिवांनी त्याला नष्ट न करता “नियंत्रणात” आणण्याचा मार्ग निवडला. त्यांनी चिदंबरम (तमिळनाडूमधील प्रसिद्ध मंदिर) येथे तांडव नृत्य केलं. हे नृत्य केवळ नृत्य नव्हतं, तर त्यामध्ये सृष्टी, संहार, पुनर्जन्म, माया आणि चेतना यांचा समावेश होता.
या नृत्यादरम्यान, अप्समार शिवाच्या तांडवात अडथळा आणायला आला. तो मंचावर आल्यावर, शिवांनी नृत्य करतानाच आपला उजवा पाय वर करून त्याला खाली दाबून टाकलं. पण त्यांनी त्याला मारलं नाही. कारण ब्रह्माचा वरदान त्याला मारू देत नव्हता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अज्ञान पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. कारण अज्ञान नसेल, तर ज्ञानालाही महत्त्व उरत नाही.
शिवांनी त्याला दबवून ठेवलं कायमचं. म्हणजे तो जिवंत आहे, पण नियंत्रणात आहे. यामध्ये एक गूढ संदेश आहे की जीवनात अज्ञान पूर्णपणे जाईलच असं नाही, पण ते नियंत्रणात ठेवणं हेच खरं ज्ञान आहे. यामधून हेही स्पष्ट होतं की भगवान शिव क्रूर नाहीत, ते संतुलन ठेवतात.
चिदंबरम मंदिरात आजही ही नटराज मुद्रा असलेली मूर्ती आहे, ज्यात शिव नाचताना अप्समारला पायाखाली दाबलेला आहे. ही मूर्ती शुद्ध स्फटिकापासून (क्रिस्टल क्वार्ट्ज) बनवलेली आहे, आणि याला “स्पदिका लिंगम” म्हणतात. ही मूर्ती सुमारे 3 फूट उंच आहे. यालाच “चिदंबरम रहस्य” असं म्हटलं जातं, कारण येथे शिव “आकाश लिंगम” (निराकार) स्वरूपातही विद्यमान आहेत.
आजही जगभरात शिवाची नटराज प्रतिमा अत्यंत प्रसिद्ध आहे. ती भारतीय शास्त्रीय नृत्य, विशेषतः भरतनाट्यममध्ये महत्त्वाची मानली जाते. अनेक देशांना भारत सरकार नटराज मूर्ती भेट देत आले आहे. ही मूर्ती चोल कालातील कांस्य शिल्पकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
ही मूर्ती फक्त कला नसून ती ज्ञान, नियंत्रण, अध्यात्म आणि संतुलनाचं एक जीवंत प्रतीक आहे आणि म्हणूनच शिवाचा नटराज रूप जगभरात वंदनीय आहे.