वाल्हे, ता. २६ : कारगिल युद्ध भारतीय सैन्याने प्राणाची बाजी लावून जिंकले. त्यांच्या धैर्य व धाडसामुळे आपण सुखाने जगत आहेत. पिंगोरी ही वीरांची खाण असलेली भूमी आहे. या युद्धात आपल्या भूमीतील जवानांनी स्वतः:च्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे योगदान देशासाठी आणि समाजासाठी अमूल्य असून कारगिल विजय दिनी सर्वांनी शहिदांच्या हौत्माम्याचा आदर करावा. त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक व्हावे, अशा शब्दात भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल सविता शिंदे यांनी आदरांजली अर्पण केली.
कारगिल युद्धात पिंगोरी गावचे सुपुत्र हुतात्मा शंकर शिंदे यांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीला उजाळा देत कारगिल विजय दिनानिमित्त पिंगोरी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत त्यांना आदरांजली वाहिली. ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (ता. २६ जुलै) शहीद स्मारकाभोवती आकर्षक फुलांची सजावट केली होती. या वेळी येथील हुतात्मा स्तंभाला जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी छाया शिंदे व शहीद रमेश शिंदे यांच्या पत्नी नंदा शिंदे यांच्या हस्ते अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी कॅप्टन श्यामराव शिंदे, तुकाराम शिंदे, माजी सैनिक अरुण शिंदे, राजेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, जयसिंग शिंदे, महादेव गायकवाड, भानुदास शिदे, रामभाऊ शिंदे, सत्यवान भोसले, संपत शिंदे, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, कैलास गायकवाड, पोलिस पाटील राहुल शिंदे, माजी सरपंच पल्लवी भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. दरम्यान, या वेळी शहीद वीरांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला. शहीद शंकर शिंदे कुटुंबीयांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. धनंजय शिंदे, रूपेश यादव, दत्तात्रेय शिंदे, जीवन शिंदे, नीलेश शिंदे, तेजस शिंदे, मयूर शिंदे, सोहेल इनामदार, प्रकाश शिंदे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. मराठी सिनेअभिनेते विनोद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच संदीप यादव यांनी आभार मानले.