>> अस्मिता येंडे
मानवी मनाचा डोह जितका खोल तितकाच भावनांचा कल्लोळ वेगाने सुरू असतो. अंतर्मन जितके बाह्य रूपात व्यक्त होत असते. त्याहून ते अधिक स्वतशी संवाद साधत असते. कवयित्री कल्पना पाटकर यांच्या ‘सावलीची झळ’ या कवितासंग्रहाच्या शीर्षकाने संवादाची माळ आपोआप विणली गेली. हा कवितासंग्रह सावलीप्रमाणे नितांत, संयमी वृत्तीने आपल्या अबोल जाणिवा प्रस्तुत करतो. संवेदना प्रकाशन प्रकाशित या कवितासंग्रहात 70 कवितांचा समावेश असून मानवी मनाच्या संवेदना, त्याची विविध रूपे, भावनांचा समतोल, अपूर्णतेची झालर, निसर्ग घटकांची प्रतीत होणारी रूपे, मानव आणि निसर्ग यातील सहसंबंध हे चित्र कोणत्याही ठरावीक चौकटीशिवाय उभे करण्याचे कसब कवयित्रीने दाखविले आहे. काही कवितांच्या ओळी नेमक्याच आहेत, पण नेमक्या ओळीत जीवनाचे सार किती सहजपणे सांगितले आहे! मनोवेधक शीर्षके, प्रतीक आणि प्रतिमांचा अप्रतिम वापर, वेदना-विरह-एकाकीपण-स्नेह या भावनांचे काव्यरमण, अबोल भावनांना प्रदान केलेली बोलकी अभिव्यक्ती या वैशिष्टय़ांमुळे कवितांना वेगळेच परिमाण लाभले आहे.
जाऊ दे, मनाचं काय मोठंसं!
आपलंच तर आहे
पावलोपावली दुखावणाऱया मनाची स्वतच समजूत घालणाऱया तिच्या वेदनांची, समजूतदारपणाची दखल घेणारी ‘जरा चुकलंच माझं’ ही कविता आहे.
‘ओध’, ‘माघार’, ‘वही’, ‘अधांतर’, ‘कृष्ण’, ‘सुरकुत्या’, ‘गर्भार’, ‘झळ’, ‘ठसे’, ‘बंद पेटी’, ‘उसवणं’, ‘सावली’ इ. या अशा अनेक कविता तितक्याच ओघवत्या आहेत.
भ्रांत, गलितगात्र, निष्प्रभ, कपोलकल्पित, शिडकावा, निपचित, अर्धोन्मीलित, दाह, प्राक्तनरेषा, शुष्क, काळ्याकभिन्न, तप्तांगार…किती व्यापक शब्दसौंदर्य ! पण असे शब्द हल्ली कानावर पडतच नाहीत. साहित्यातून अशी शब्दपेरणी व्हायला हवी. अशा शब्दसामर्थ्याने हा कवितासंग्रह अधिक प्रगल्भतेने उभारून आला आहे. कवयित्रीने किती सहजसुंदर शब्द संयोजन करून कवितेचे सौंदर्य उलगडले आहे.
या कवितासंग्रहाला पाप्टन वैभव दळवी यांची प्रस्तावना लाभली आहे. सतीश भावसार यांनी समर्पक मुखपृष्ठ साकारले असून ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी पाठराखण केली आहे. मूक भावनांची संवेदना अनुभवण्यासाठी हा कवितासंग्रह नक्कीच संग्रही असावा!
सावलीची झळ – कवितासंग्रह
कवयित्री ः कल्पना पाटकर प्रकाशक ः संवेदना प्रकाशन मूल्य ः 125 रुपये