पुणे : शहरात गुन्हेगारी टोळ्या आणि जागा माफियांकडून मोक्याच्या जागांवर कब्जा करण्याची उदाहरणे समोर येत आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या ठिकाणी इमारतींचे बांधकामही करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. भविष्यात अशा जागांची मालकी मूळ जागामालकांस मिळाल्यानंतर सदनिकाधारकांच्या फसवणुकीला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील चंदननगर, वडगावशेरी, विमाननगर, लोणीकंद, कोंढवा आणि इतर भागांत अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. कोंढवा पोलिस ठाण्यात जबरदस्तीने कब्जा केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कठोर कारवाई करण्यात आली. दुसरीकडे कोंढवा परिसरातील येवलेवाडी, पिसोळी भागांतही काही ठिकाणी बेकायदा प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यासंदर्भात पोलिस, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
भरपाई कोणाकडून मागायची?
माफियांकडून परस्पर जागा बळकावून त्यावर इमारती उभ्या करून सदनिकांची विक्री केली जाते. मूळ जागामालक न्यायालयात गेल्यानंतर जागेचा अधिकार त्याच्या बाजूने लागतो. मात्र, तोपर्यंत त्या जागेवर उभी असलेली संपूर्ण इमारत, विकलेल्या सदनिका आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबांचे काय? त्यामुळे नुकसानभरपाई कोणाकडून मागायची, असा प्रश्न उपस्थित होतो.
बनावट नोंदणी केल्यास कारवाई
वाघोलीतील जागेसंदर्भात बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसांनी नुकताच संबंधित दुय्यम निबंधकांवर गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर यापुढेही कारवाई करण्याची गरज आहे. तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसणार नाही.
कारवाईत दिरंगाई
पोलिसांकडून काही ठरावीक प्रकरणांत कारवाई केली जाते. परंतु बहुतांश प्रकरणांत गुन्हा दाखल न करता ‘तपास सुरू आहे’, अशा कारणाने वेळकाढूपणा केला जातो. यामुळे आरोपींना इमारत उभारण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे पोलिसांनी जागेच्या मूळ कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
काही प्रातिनिधिक उदाहरणे
वडगावशेरी परिसरात एका ज्येष्ठ महिलेची जागा बळकावल्याची चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार. मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही. आता त्या ठिकाणी बांधकामही सुरू असल्याची ज्येष्ठ महिलेची तक्रार. याबाबत महिलेची पोलिस प्राधिकरणात धाव. न्याय कधी मिळणार?
लोणीकंद भागातील डोंगरगाव परिसरात बनावट मृत्यूपत्राच्या आधारे जागा बळकावल्याची ज्येष्ठ महिलेची तक्रार, न्यायालयात प्रकरण दाखल.
एका तत्कालीन पोलिस निरीक्षकासह चौघांकडून बनावट दस्तऐवज तयार करून वाघोलीतील एका महिलेची दहा एकर जागा हडपण्याचा प्रयत्न. वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
कोंढव्यात सराईत गुन्हेगारांच्या टोळीकडून एका महिलेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न. आरोपींवर ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई.
‘‘परस्पर जागा बळकावणे, बनावट दस्त आणि फसवणुकीच्या जुन्या घटना समोर येत आहेत. अशा तक्रारींबाबत पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे. या प्रकारच्या गुन्ह्यांतील आरोपींवर ‘मकोका’सारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही फसवणूक टाळण्यासाठी खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावा.’’
- मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्तपोलिसांकडून काही ठरावीक प्रकरणांत कारवाई केली जाते. परंतु बहुतांश प्रकरणांत गुन्हा दाखल न करता ‘तपास सुरू आहे’, अशा कारणाने वेळकाढूपणा केला जातो. यामुळे आरोपींना इमारत उभारण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे पोलिसांनी जागेच्या मूळ कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज आहे.