कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात नुकतच लेटर वॉर झालं. त्यावर संजय शिरसाट यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून बैठका घ्या असं तुम्ही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं. त्यावर त्यांनी बैठक घेण्याच्या प्रक्रियेसंबंधी CMO कार्यालयाला विचारुन सांगेन असं उत्तर दिलं. “माझा उद्देश स्पष्ट होता, काही विषय असे असतात, एखादा निर्णय घ्यायचा ठरला, तर राज्य मंत्र्यांच्या अधिकारात तो विषय येत नाही. माझ्या सुद्धा अधिकारात ते नसतं. काही स्टेप्स आहेत, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री म्हणून सूचना अशी केलेली की, तुम्हाला बैठका घ्यायच्या असतील तर मला कल्पना द्या. तुम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार असाल, तर माझी समती आहे. पुन्हा फाईल फिरवा असे प्रकार टाळण्यासाठी सहकारी म्हणून मी त्यांना अशी सूचना केली होती” असं संजय शिरसाट म्हणाले.
“यात वादविवाद असण्याचं कारण नाही. आमच्या महायुतीत दरी पडलीय असं समजण्याच कारण नाही” असं शिरसाट म्हणाले. मुख्यमंत्री कार्यालयाला विचारुन बैठका घेऊ ही आव्हानाची भाषा आहे का?. “मला असं आव्हान वैगेरे नाही वाटतं. त्यांनी त्यांचं मत मांडलं. मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. माझी काही हरकत नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.
‘मी आता गावाकडे निघालोय, त्यांना भेटणार नाही’
“मला कल्पना द्या अशी सूचना केली. सारखं, सारखं पत्रव्यवहार करणं माझ्या स्वभावात नाही. मला सूचना करायची होती, मी केली. त्यांनी त्यांचं उत्तर दिलय. कोणतातरी वाद निर्माण झालाय असं समजण्याच कारण नाही. मी आता गावाकडे निघालोय. त्यांना भेटणार नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.
फोन टॅपिंगच्या आरोपावर काय म्हणाले?
रोहित पवार यांनी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप होतायत असे आरोप केले, त्यात तथ्य वाटतं का?. “रोहित पवार यांना काय करायचय. आमचे फोन टॅप होतायत की नाही ते आम्ही पाहू. असं करण्याची आवश्यकता काय?. सरकार आमचं आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत. फोन टॅपिंग का होईल?. रोहित पवार बेसलेस गोष्टी बोललेत” असं बोलून संजय शिरसाटांनी रोहित पवारांचा आरोप उडवून लावला. “सत्ताधारी आमदारांमध्ये चलबिचल कशी होईल म्हणून त्यांनी हे केलय. सरकार प्रगतीच्या दिशेने चाललं आहे. आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.
राजीनाम्याच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं?
विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “तुमच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. प्रत्येक नेत्याच त्या संबंधित मंत्र्याशी बोलण झालेलं असतं. आम्ही त्या आरोपांकडे गांभीर्याने पाहत नाही”