कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या जोडीने चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत झुंजार आणि नाबाद शतकी भागीदारी करत भारताला सावरलं आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात 669 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे पहिल्या डावात 311 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने त्यानंतर टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. ख्रिस वोक्स याने यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या जोडीला भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे भारताची स्थिती 2 आऊट 0 अशी झाली होती. मात्र त्यानंतर शुबमन आणि केएल या जोडीने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला. भारताने 63 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया 137 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पाचव्या दिवशी अशीच खेळी करुन सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.